ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी पंचायत समिती निवडणूक 
भाजपला चारीमुंडया चीत करण्यासाठी महायुतीची मोट 
भिवंडी  ( नितिन पंडीत  ) : ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या भिवंडी पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे . विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप पक्षाला या निवडणुकीत चारी मुंड्या चित करण्यासाठी शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी , मनसे,  श्रमजीवी संघटना , कुणबी सेना यांच्यासह इतर राजकीय पक्ष व संघटना एकत्र आल्या असून महायुती स्थापन केली आहे . मात्र देशातील महत्वाचा राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष्याची वेगळी ओळख आहे . सध्या केंद्रासह राज्यात भाजपचे सरकार असले तरी काँग्रेस पक्षाने आपलं अस्तित्व कायम ठेवले आहे .  सध्या भाजप सरकार विरोधात जनतेमध्ये पसरलेली नाराजी पाहता काँग्रेस पक्षाला जनतेकडून  पुन्हा भावनिक साथ मिळत आहे . त्यामुळे काँग्रेस पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागली आहे . आगामी ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भिवंडीत काँग्रेसने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे .

 भिवंडीतील पडघा येथील हॉटेल पुष्कर मेला येथे काँग्रेसचे भिवंडी तालुका अध्यक्ष राकेश पाटील  यांच्या पुढाकाराने काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नुकतीच सभा संपन्न झाली . या सभेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी करण्यात आली असून कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून जोमाने कामाला सुरुवात करावी असे आवाहन याप्रसंगी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिले . या सभेस माजी मंत्री मधू चव्हाण , माजी खासदार सुरेश टावरे , आमदार अशोक जाधव , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व ठाणे जिल्हा प्रभारी सुभाष कानडे , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यशवंत हप्पे , प्रदेश सचिव राजाराम देशमुख आदी काँग्रेसचे जैष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते .
सत्ता बदला नंतर देशात अच्छे दिन येणार , देशातील बेरोजगारांना रोजगार मिळणार , शहरांबरोबर ग्रामीण भागाचा विकास करणार या व अशी अनेक स्वप्ने भाजप सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दाखवली होती . मात्र सध्या देशातील व राज्यातील समस्या सोडविण्यास भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे . अशी टीका या मेळाव्याप्रसंगी काँग्रेस नेत्यांनी करत देशातील व राज्यातील जनतेच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाचा हात सदैव जनतेच्या सोबत आहे अशी ग्वाही याप्रसंगी देण्यात आली . तसेच जिल्हा परिषदेच्या २१ गट व पंचायत समितीच्या ४२ गणांसाठी उमेदवारांची चाचपणी देखील करण्यात आली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील अशी ग्वाही काँग्रेसचे भिवंडी तालुका अध्यक्ष राकेश पाटील यांनी दिली. याप्रसंगी काँग्रेसचे तालुका महासचिव संदीप जाधव , कोषाध्यक्ष सचिन पाटील , ठाणे जिल्हा अल्प संख्यांक अध्यक्ष जव्वाद चिखलीकर , माजी नगरसेवक अब्दुल कलाम अशरफी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर तरे यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!