मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांच्या मागे  केंद्रीय तपास यंत्रणांचा सिसेमिरा सुरू झालाय. मविआ सरकारमधील मंत्री जेलची हवा खात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरूध्द भाजप असा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने या भेटीची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत रंगलीय. मात्र राजकीय विश्लेषकांकडून या भेटीचे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 


गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रयावर आणि नेत्यांवर कारवाया होत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपकडून दबावतंत्राचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे अटक आहेत. मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करून त्यांची ११ केाटीची संपत्ती जप्त केली. तर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचीही संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा संघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसून येतय. त्यामुळे पवार- मोदी भेटीचा हाच मुख्य धागा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. 


पवार मोदी भेटीनंतर राजकीय चर्चानाही उधाण येत असते, यापूर्वीही अनेकवेळा राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची चर्चा  रंगवली जाते, सध्या ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनच्या नेत्यांभोवती कारवाईचा आणि चौकशीचा फास आवळला आहे त्यामुळे यावेळी ही याकडं या दृष्टीकोनातूनही पाहिलं जातय. मात्र राज्य सरकार स्थिर आहे असे सांगून पवारांनी हा प्रश्न उडवून लावलाय. 


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची किनारही या भेटीला जोडली जात आहे. अंजली दमानिया यांनी पवार मोदी भेटी संदर्भात यासंदर्भात ट्विट केलय. दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हलयं,  पवारांना राष्ट्रपती बनायचे आहे. जर भाजपा ने बनवलं तर महाराष्ट्रात भाजपा- राष्ट्रवादी सरकार.  नाही बनवलं तर इतर Anti BJP पक्ष्यांचा व छोट्या पक्षांचा सपोर्ट घेऊन ते शर्यतीत उतरणार. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार- मोदी भेटीची ही  चर्चा ही रंगलीय. 


दिल्लीत सर्वपक्षीय आमदारांचे प्रशिक्षण सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ६ जनपथ या निवासस्थानी चहापानी आणि भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. त्यानंतर दुस-याच दिवशी पवारांनी मोदीची भेट घेतलीय. पवार मोदी भेटीची चर्चा नेहमीच चर्चिली जाते, पण अनेक राजकीय घडामोडींमुळे यावेळी अधिक रंगलीय.

शरद पवार म्हणाले, या दोन विषयांवर चर्चा  ….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान मोदींसोबत दोन विषयांवर चर्चा केल्याचं सांगितलं. “महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांबाबत मी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली नाही. मी यातील केवळ एका प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा केली. संजय राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत, मात्र ते महाराष्ट्रातील सामना वर्तमानपत्राचे संपादक देखील आहेत. परवा त्यांचे फ्लॅट आणि अलिबागमधील अर्धा एकर जमीन ईडीने जप्त केल्या आहेत. हा अन्याय आहे. आम्ही ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या लक्षात आणून दिली,” असं शरद पवार यांनी सांगितलं.  तसेच मागील दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघांमधील प्रतिनिधींच्या जागा मागील दोन अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. या दोन विषयांवर चर्चा केल्याचे पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 

One thought on “मोदी- पवार भेटीचे हे संकेत ….”
  1. चर्चासत्रात काय होईल ते बघायचे हा राजकीय खेळ असून जनतेची दिशाभूल कलणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *