sanjay-raut

मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आज अंमलबजावणी संचलनालय संचलनालय ( ईडी) ने कारवाई केलीय. राज्यातील मंत्रयावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता संजय राऊत ईडीच्या जाळयात अडकल्याने  ठाकरे सरकारला हा मोठा धक्का समजला जात आहे.  अलिबाग येथील ८ भूखंड आणि दादर येथील फ्लॅट ईडीने जप्त केल्याची माहिती मिळते आहे, तसंच १  हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणीही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण …

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत म्हाडा चा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25% शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.


2020 मध्ये पीएमसी बँक घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुरु आशिष कंपनीचे नाव समोर आले होते. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून 2010 साली संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाख रुपये कर्ज म्हणून देण्यात आले होते. या पैशातून संजय राऊत यांनी मुंबईतील दादर परिसरात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी प्रवीण राऊत यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसेच ईडीने यापूर्वी प्रवीण राऊत यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. प्रवीण राऊत, सारंग वाधवान, एचडीआयएलचे राकेश वाधवान, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन आणि इतरांची आरोपपत्रात नावे आहेत.


गुन्हा सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन : संजय राऊत 


संजय राऊत यांनी संपत्ती जप्त केल्यानंतर ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘असत्यमेव जयते!’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत  माध्यमांशी बोलताना म्हणाले, “अशा कारवायांपुढे शिवसेना झुकणार नाही. मी कष्टाने कमवलेली संपत्ती आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन.”

देशात लोकशाही राहिली आहे का? – आदित्य ठाकरे


संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेतेमंडळींकडून भाजपवर जोरदार टीका केली जातेय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी  ही कारवाई  राजकीय हेतूने करण्यात आली असून देशात लोकशाही राहिली नाही असा सवाल उपस्थित केलाय.


ईडीच्या कथित खंडणी प्रकरणी एसआयटीची स्थापना 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकारी व व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आलीय. अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी काम करेल अशी माहिती  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना  दिली. ईडीला हाताशी घेऊन खंडणीचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. राऊत यांनी या प्रकरणी नवलानी व ईडी अधिकाऱ्यांनी काही कंपन्यांकडून रक्कम घेतल्याचा आरोप केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *