मानपाडा पोलिस ठाण्याचे दोन पोलीस निलंबित;
मारहणीच्या घटनेत बघ्याची भूमिका घेतल्याने करवाई
डोंबिवली (आकाश गायकवाड) : सहा दिवसांपूर्वी खोणी परिसरात जमावाच्या बेदम मारहाणीत एका अनोळखी व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा अमित पाटील, सागर पाटील, बाळाराम फरड या तीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक केलीय. मात्र त्या घटनेदरम्यान गस्त घालणारे मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई एच.एम.गरड आणि पोलीस नाईक एस.व्ही.कचवे या दोन पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कल्याण पोलीस उपायक्त संजय शिंदे यांनी त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली आल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कब्दुले यांनी दिली.
बुधवारी 25 आॅक्टोबर रोजी नेवाळी भागातून येणा-या ट्रकमध्ये एका अनोळखी व्यक्तिचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी ट्रक थांबल्यावर त्याने एका दुकानातून झाडू घेतला. त्याला दुकानदाराने विरोध केला, त्यावर त्याने दुकानदारालाही त्याने झाडूने मारहाण केली. त्यावेळी जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यावेळी टेम्पोकडे धाव घेत त्या तरुणाने पळ काढला. त्या टेम्पोची दुस-या टेम्पोला धडक बसल्याने त्या घटनेतही त्याला बेदम मारहाण झाली. त्यावेळीही जमावाने त्यास मारहाण केली. त्या मारहाणीत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला उपचारासाठी नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान मृत व्यक्ती हा उत्तर प्रदेश येथे राहणारा असून तो मानसिक आजारावर उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पुढील तपासासाठी पोलिसांचे एक पथक उत्तप्रदेशकडे रवाना झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
—