मुंबई : नौसेना अधिकारी कॅप्टन राहूल मल्होत्रा यांच्याकडून कर्मचा-यांना झालेली जातीवाचक शिवीगाळ आणि कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी इंडियन नेव्हल एम्प्लॉईस युनियनच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण आंदोलन छेडण्यात आले. जातीवाचक शिवीगाळ करणा-या अधिका-यावर कडक कारवाई करावी अशी मागणी युनियनच्यावतीने करण्यात आली आहे.
निर्वाचित वर्क्स कमिटी मेंबर निखिल साळवे हे अनुसुचित जातीचे असून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे याप्रकरणी नौसेना प्रशासनाकडे कायदेशीर लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र हेडक्वार्टर वेर्स्टन नेव्हल कमांडने याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई अथवा तक्रारीची दखल घेतलेली नाही. तसेच सदर प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली आहे. कॅप्टन राहूल मल्होत्रा द्वारा निर्वाचित मेंबर यांना देशद्रोही चोर व कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे इंडियन नेव्हल एम्प्लॉईज युनियनने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन छेडले आहे. तसेच कामगारांना मिळालेल्या वेतनामधून चुकीच्या पध्दतीने वेतन रिकव्हरी करणे, रिजनल लेबर युनियन द्वारा निर्देश देऊनही वर्क्स कमिटी मेंबरचे गठण करण्यास नकार देणे आदी मागण्यांसंदर्भात आंदोलन करण्यात आल्याची माहिती युनियनचे जनरल सेक्रेटरी रविंद्र चव्हाण यांनी दिली. या आंदोलनात युनियनचे अध्यक्ष प्रदीप गांधी, मिलींद कोळी, अजित भास्करन, एस टी कोंडगेकर, अजय सांबरी यांच्यासह अनेक कर्मचारी व कामगार वर्ग सहभागी झाला होता.