डोंबिवली : एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने पालकमंत्री हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केला हेाता, या आरोपानंतर आता शिवसेनेने डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत आमदार चव्हाण यांच्यावर पलटवार केलाय. शिवसेनेने डोंबिवलीत बॅनर लावण्यात आले असून चव्हाण यांनी तीन कामे दाखवा असे आवाहन केलय, त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे विरूध्द चव्हाण असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

डोंबिवलीत शिवसेनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, १३ वर्षांत आमदारकी भोगणा-या आणि तीन वर्ष स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना राज्यमंत्रिपदी बसणाऱ्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीने आपल्या मतदारसंघात कोणतेही दाखवणे जोगे काम केले नाही. आपल्या निष्क्रियतेमुळे आता स्वतःचे सहकारी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असल्याचे पाहून पायाखालची वाळू सरकल्याने नैराश्यातून आमदार रवींद्र चव्हाण पालकमंत्र्यांवर आरोप करत असल्याचा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.

३ वर्षे राज्यमंत्री असताना रविंद्र चव्हाण डोंबिवलीत फिरकले नाहीत. डोंबिवली सोडून ते पूर्ण कोकण फिरले. त्यामुळे त्यावेळी त्यांना डोंबिवली शहराचा विसर पडला होता. विधानसभा निवडणूक जवळ येताच त्यांना शहर विकासाची आठवण झाली. त्यावेळी या ३४ रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी त्यांनी पाठपुरावा केला. फडणवीस सरकारच्या अगदी शेवटच्या काळातच हा ४७१ कोटींच्या प्रस्ताव होता. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. मात्र त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे कामाच्या निविदा निघाल्या नाहीत. ज्या कामाच्या निविदा नाहीत त्यांचे कार्यादेश दिले जात नाही. ही साधी तांत्रिक जर १३ वर्ष आमदार असलेल्या लोकप्रतिनिधीला कळत नसेल तर त्यांनी अभ्यास करावा, असा खोचक टोला शिवसेनेने लगावला.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर निविदा आणि कार्यादेशाशिवाय रस्ते कामाचे नारळ फोडणाऱ्या आमदाराने डोंबिवलीकरांची फसवणूक केली. आता आपले अपयश झाकण्यासाठी चव्हाण आरोप करत सुटले आहेत. राज्याचे नगर विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गेल्या दोन वर्षात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी तब्बल १ हजार ६९० कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यातील बहुतांशी प्रकल्प पूर्ण झाले असून काही प्रकल्प सुरू आहेत असे शिवसेनेने स्पष्ट केलय.


देश, राज्य आणि डोंबिवली शहर ज्यावेळी करोनाच्या संकटात सापडले होते. त्यावेळी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणारे हेच डोंबिवली शहराचे आमदार स्वतःच्या गावी कोडी सोडवत विरंगुळ्यात घरी बसून तिकडून अधिकाऱ्यांना फोन करत उंटावरून शेळ्या हाकत होते. त्यावेळी जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रत्यक्ष मैदानात उतरून करोनाशी दोन हात करण्यासाठी जंग जंग पछाडत होते. करोनाचा दोनदा संसर्ग झाला असला तरी आपल्या मतदारसंघातील मतदारांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जीवाची पर्वा न करता कुटुंबापासून दूर राहत मतदारसंघात फिरत होते. राज्यभरात ऑक्सिजनची कमतरता असताना कल्याण डोंबिवलीत ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता होती. यामुळे कल्याण डोंबिवलीत करोना काळात झालेल्या नाविण्यापूर्ण कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी शहरासोबत कल्याण डोंबिवली शहरालाही कोविड इनोवेशन पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांना विकासाचे खरे निर्माते कोण आहेत आणि मारेकरी कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही, अशीही खरमरीत टीका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत कल्याण उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *