घनकचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत असतानाच, भारतामध्ये या समस्येवर उपाययोजना करून त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी करणारी महाराष्ट्रमधील वेगुर्ला ही देशातील पहिली नगरपरिषद ठरलीय, तिचे अनुकरण देशातील सर्व शहरांनी करावे अशा वेंगुर्ला पॅटर्नला नुकतेच सीबीएससी च्या शालेय अभ्यासक्रमामध्ये इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्थान मिळाले आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही गौरवास्पद बाब आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त डॉ रामदास कोकरे हे वेंगुर्ला पॅटर्नचे जनक आहेत. याविषयी केडीएमसीचे उपअभियंता मिलींद गायकवाड यांनी टाकलेला प्रकाश !


महाराष्ट्राने देशाला अनेक गोष्टी प्रथम दिले आहेत मग ती रोजगार-हमी-योजना असो की स्त्रियांच्या बालिकांच्या प्रगतीचे कायदे असोत. काही माणसे जन्माला येतात तीच मुळी काहीतरी ध्येय्य घेऊन. त्यासाठीच ते जगतात आणि त्यासाठीच अजरामर होऊन जातात. आपण एवढे छोटे असतो की ती त्यांची भविष्यचा वेध घेणारी दृष्टी आपल्या दृष्टीक्षेपात येत नाही व आपण त्यांना वेडे ठरवून मोकळे होतो .मात्र कालांतराने त्या व्यक्तीच्या दुरदृष्टीपणामुळे आपले जीवन किती सुसह्य झाले आहे, याची जाणीव होते व त्या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू लागतो. मात्र त्या व्यक्तीला आपण सहकार्य करू लागलो तर ‘याची डोळा याची देही’ आपण स्वतःही त्या कृतज्ञतेचा अनुभव घेऊ शकतो. आधुनिकतेमुळे आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आलेले आहेत. त्याचे जे काही चांगले आणि वाईट परिणाम आहेत त्याचे प्रत्यंतर येण्यासाठी काही कालावधी जाणे आवश्यकच असतो.त्यानंतरच त्याचे मूल्यमापन होत असते.


पर्यावरणाचे प्रश्न भविष्यात आक्राळविक्राळ रूप धारण करून संपूर्ण सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला मारक ठरू शकतात हे समजणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असली तरी काही दुरदृष्टिकोन असलेले अवलिया यांच्या ते बरोबर लक्षात येते आणि म्हणूनच संपूर्ण सृष्टीच्या रक्षणार्थ ते पावले उचलू लागतात .आपले जीवन त्या कार्याला समर्पित करीत असतात. असाच एक अवलिया म्हणजे श्री रामदास कोकरे ! वेंगुर्ला पॅटर्नचे ते जनक आहेत. सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या व कृषी विद्यापीठातून एम. एस्सी. ही पदव्युत्तर पदवी ग्रहण केलेल्या श्री. कोकरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले व सन २००६ साली त्यांची नियुक्ती रत्नागिरी येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर झाली. पोलीस म्हटले म्हणजे आपल्या मनात दहशती शिवाय काहीही येत नाही. मात्र त्यांच्यकडे असलेल्या बीटमधील गावांच्या मध्ये त्यांनी संपर्क साधून नागरिकांचा विश्वास संपादन करुन संपूर्ण सोळा गावे तंटामुक्त करण्याचा अनोखा प्रयत्न यशस्वी करून दाखवला. पुन्हा स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची नियुक्ती मुख्याधिकारी पदावर दापोली येथे झाली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या अंतर्मनाच्या कार्याची छाप कामावर पडू लागली. दापोली येथे २०१० ते २०१२ मध्ये काम करीत असताना त्यांनी प्लास्टिक मुक्त दापोली शहर मोहीम राबवली व कचऱ्याचे वर्गीकरणा बरोबरच हरित शहर असा नाव लौकिक दापोलीला मिळवून दिला. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाचे कोकण विभागाचे प्रथम पारितोषिक व सन २०१२ साली वसुंधरा पुरस्कार त्यांनी दापोली शहराला मिळवून दिला.मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला चालना मिळाली ती सन २०१५ मध्ये वेंगुर्ला नगरपालिकेवर मुख्याधिकारी या पदावर नियुक्ती झाल्यापासून. येथे काम करीत असताना डंपिंग ग्राउंड मुक्त शहर ही संकल्पना त्यांनी राबविली. त्यासाठी लोकांमध्ये मिसळून लोकांना सहकार्य करण्यासाठी प्रवृत्त केले. कचऱ्याचे २७ वेगवेगळे प्रकार वर्गीकरणा मध्ये निर्माण करून त्यामधून नगरपालिकेला उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळवून दिला. अगदी डोक्यावरील केसांपासून ते जुने फाटलेले चिंध्या झालेल्या कपड्यांपर्यंत प्रत्येक भंगार वस्तूला त्यांनी मुल्य मिळवून दिले.


कचरा हा मुळात कचरा नसतोच *आपल्या डोक्यामध्ये कचरा असतो ही संकल्पना पक्की बसलेली असते. त्यामुळे कच-याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पारंपारिक असतो. या दृष्टिकोनामुळे आपण कच-याकडे तुच्छतेने पाहत असतो. एवढेच नाही तर कचऱ्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ही आपण तुच्छतेने पाहत असतो. या दृष्टिकोनात मध्ये बदल घडवून आणायचा असेल तर आधी माणसाच्या डोक्यात असलेला कचरा साफ करणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच कोकरेंनी परिसरातील कचरा स्वच्छ करण्याबरोबरच माणसांच्या डोक्यातील कचरा काढण्याचे काम सुरू केले. आपल्या संतांची व महापुरुषांची छाप समाजावर असल्यामुळे समाजाने हा बदल थोड्या प्रयत्नानंतर स्वीकारला. लोक स्वतःच्या घरामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करु लागले व नगरपालिकेला घंटागाड्यांमध्ये कचरा देऊ लागले. नगरपालिकेने कचऱ्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पादनामुळे फायदा झाला. संपूर्ण वेंगुर्ला शहर कचरामुक्त शहर म्हणून नावलौकिकाला आले. केवळ देशभरच नाही तर जागतिक पातळीवर त्याची दखल घेतली गेली. बायोगॅस पासून खत निर्मिती व वीज निर्मिती, पर्यावरणाचे रक्षण यासारख्या अनेक बाबी केवळ घनकचऱ्याच्या योग्य नियोजनामुळे शक्य झाल्या. घनकच-याचे रूपांतर धनकच-यामध्ये असे झाले. नगरपालिकेला अनेक सन्मान मिळाले. त्यानंतर ते तिथून कर्जत नगरपालिकेत बदलून गेले. तेथे गेल्यावर पाहिले तर सर्वत्र घाणीचे साम्राज्य. डम्पिंग ग्राउंडची दुर्गंधी, तुंबलेली गटारे, खड्डेमुक्त रस्ते . अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी सर्वप्रथम नगरसेवक व कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेतले. हे चित्र आपण बदलू शकतो हा विश्वास दिला. आणि ते कामाला जुंपले. डम्पिंग ग्राउंडचे बायोमायनिंग पद्धतीने वर्गीकरण सुरू केले. कचरा वर्गीकरण घरातच करायचा ही संकल्पना राबवली. प्लास्टिक वर बंदी घातली. कचरा घंटागाडीतच देण्याबाबत प्रत्येकावर बंधन घातलं आणि कापडी पिशवी वापराला प्राधान्य दिले. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, सुक्या कचऱ्याचे पुनर्वापर, शहाळे पासून कोकोपीट व काथ्या असे अनेक प्रकल्प सुरु केले. कचरा कमी पडू लागला म्हणून आजूबाजूच्या ग्रामपंचायतीकडून शुल्क आकारून कचरा घेऊ लागले.डंपिंग ग्राउंड नष्ट करून त्याचे रूपांतर पर्यटन स्थळांमध्ये केले. महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिवांनी तेथे डंपिंग ग्राऊंडवर अनेकदा कार्यशाळा घेतल्या व जमलेल्या सर्व मुख्याधिकार्‍यां समवेत तेथे भोजन केले.

कर्जतचा पदभार असतानाच त्यांच्याकडे माथेरान चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. माथेरान वर पडलेला कचरा व प्लास्टीक त्यांनी रेल्वे व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून खाली आणले. व प्रवेशद्वारावर सुरक्षा बसवून प्लास्टिकच्या वस्तू वर नेण्यास बंदी घातली. दंडात्मक कारवाई सुरू केली व माथेरान स्वच्छ केले . माथेरानला मात्र अघटीत घडले. सहसा प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव कोणी रस्त्याला देत नाही. मात्र माथेरानच्या नागरिकांनी व नगरसेवकांनी माथेरान मधील रस्त्याला श्री रामदास कोकरे मार्ग असे नाव घेऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे. आता तुलनेने फार मोठे शहर असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापालिकेचे आयुक्त माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब यांनी त्यांना आणले आहे व महापालिकेचा कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचे शिवधनुष्य त्यांच्या हाती दिले आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करणे व संपूर्ण महापालिका क्षेत्र स्वच्छ ठेवणे ही प्रमुख आव्हाने आहेत. त्या दृष्टीने ते आव्हान त्यांनी स्वीकारले असून करोना रोगाचा प्रादुर्भाव असतानाही त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. कामगार, कर्मचारी यांच्याबरोबर सुसंवाद करून आपल्याला नेमके काय करायचे आहे याची कल्पना त्यांनी कामगारांना व कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्याचबरोबर नागरिकांबरोबर थेट संवाद, नागरिकांसाठी 24 तास दूरध्वनी सेवा उपलब्ध, प्रत्यक्ष जागेवर जाऊन समस्यांची सोडवणूक, माननीय पदाधिकारी, नगरसेवक यांचे सहकार्य, खर्च होणाऱ्या पैशाची जास्तीत जास्त बचत ,प्रत्येक समस्येवर जागेवरच तोडगा ,अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे व नागरिकांना शून्य कचरा मोहिमेमध्ये सहभागी करून घेणे ही त्यांच्या कामाची काही वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये असली तरी स्वच्छ शहरे ही त्यांची आंतरिक तळमळ सर्वात मोठी आहे .

शहरे ,गावे हे स्वच्छ झाली तर देश स्वच्छ होईल, येथील हवा स्वच्छ होईल ,आजारपण नष्ट होईल व सुदृढ नागरिकांची नवीन पिढी जन्माला येईल. देश बलवान होईल अशी त्यांची धारणा आहे. आपण सहकार्य करून या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवणे ही काळाची गरज आहे. श्री कोकरे यांच्या या आगळ्यावेगळ्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेली असून नुकतेच जॉर्जिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी दिलेली आहे देशातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी वेगुर्ला पॅटर्नवर संशोधनात्मक लिखाण करत आहेत पीएचडी करत आहेत हजारो परदेशी पर्यटक वेंगुर्ल्याला भेट देऊन अभ्यास करत आहेत.

आज देशामध्ये अतिशय सुलभ कारणाने लोकांच्या भावना दुखावल्या जातात. एखाद्या राष्ट्रीय महापुरुषाबद्दल केलेली टिपणी असो किंवा कोणाच्या जातीचा उल्लेख असो ,जात धर्म, देश, महापुरुष ,पुस्तके इत्यादी अनेक गोष्टी भावना भडकवण्याचे कारण ठरत आहे. मात्र ज्यामुळे आपल्या भावना खरोखरच दुखवायला पाहिजेत अशा गोष्टीकडे आपण ढुंकूनही पाहत नाही .त्या गोष्टीकडे सर्रास कानाडोळा करतो. आपली पृथ्वी, जिला आपण मातेचा दर्जा दिला आहे ,तिने दिलेल्या हवेमुळे आपण श्वास घेऊ शकतो, पाण्यामुळे तहान भागवू शकतो, तिच्या मातीतून उगवणाऱ्या अन्नधान्य, फळे यामुळे आपला उदरनिर्वाह चालतो ,ती आहे म्हणूनच आपले अस्तित्व आहे ह सुद्धा आपल्याला कळते. पण तीची आपणच केलेली दूर्दशा मात्र आपल्या नजरेस पडत नाही. हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, जमीनीची खालावत चाललेली सुपीकता ,यामुळे होत असलेले पर्यावरणीय घातक बदल या कशा ही मुळे आपल्या भावना दुखावत नाहीत हेच मोठं आश्चर्य आहे.

इतिहासाचा धांडोळा घेतला तर आपल्याला सहज आठवते की वातावरणीय बदल यामुळे महाकाय डायनासोरचे अस्तित्व नष्ट झाले आहे .मोहेंजोदारो हरप्पा या सिंधू संस्कृतीचे पतन झाले. भगवान श्रीकृष्णाने वसलेली द्वारका पाण्याखाली बुडाली. प्रत्यक्ष देवही तिला वाचू शकले नाही. आता मागील दोन वर्षापासून करोणामुळे लक्षावधी माणसे हकनाक गेली आहेत, त्यांना वाचवायला कोणी देव आला नाही. याचे कारण आपण शोधत नाही .आपण केलेल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगावी लागतात. एवढेच नाही तर त्याचा दुष्परिणाम आपल्या भावी पिढ्यांवर होत असतो. म्हणून तर आपले चांगले कर्म करणे आपल्या हातात आहे. पृथ्वीला विनाशापासून वाचवायचे असेल तर आपण पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरलेल्या गोष्टी टाळायला पाहिजेत. घन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे हा त्यावरचा एक उपाय आणि त्यासाठी डॉ.कोकरेंनी जी त्रिसूत्री सांगितली आहे ,त्याचा आपल्या स्वतःच्या घरापुरता विचार प्रत्येकाने करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ते तीन सूत्र म्हणजे १) कचऱ्याचे वर्गीकरण करणे २) कचरा घंटागाडीतच देणे आणि ३) प्लास्टिकचा वापर टाळणे या तीन त्रिसूत्रीच्या साह्याने आपले कोणतेही शहर ,मग ते मोठे असो ना छोटे ,स्वच्छ व सुंदर बनू शकते. घनकचरा व्यवस्थापनाचा डॉक्टर रामदास कोकरे कृत वेगुर्ला पॅटर्न आता राष्ट्रीय स्तरावर सीबीएसईच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने निश्चितच ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचे शाब्दिक अभिनंदन करण्याबरोबरच प्रत्यक्षात त्यांच्या कामाचा एक भाग होणे अधिक संयुक्तिक असल्याने त्यांच्या कार्यात सहभागी होणे कामी व आपले शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद !

लेखक : श्री मिलिंद गायकवाड
उप अभियंता, घनकचरा व्यवस्थापन
कल्याण डोंबिवली महानगरपालिका


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *