कॅन्सर किंवा कर्करोग हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार आहे. हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. कर्करोगाच्या काही प्रकारांवर अजूनही उपाय उपलब्ध नाहीत त्यावर संशोधन चालू आहे. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो, हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे. यातले पहिले कारण म्हणजे तंबाखू किंवा सिगारेट. वारंवार आपण कर्करोगाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या जाहिराती पाहतो. यात या प्रमुख दोन कारणांमुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो असे सांगतात. पण या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत. जंक फुड, सतत चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील कर्करोगाला कारणीभूत आहेत.
अलीकडे महिलांमधील स्तनांच्या कर्करोगात वाढ होऊ लागली आहे. प्रत्येकी एक लाख महिलांपैकी २५ महिलांना स्तनाच्या कर्करोगाची लागण होते आणि त्यापैकी १२.७ महिलांचा मृत्यू होतो. आहाराच्या पद्धती, बदलती जीवनशैली, शहरीकरण, पाश्चिमात्यकरण, अनुवांशिकता, बाळाच्या जन्माच्या वेळी दूध न पाजणे या कारणांमुळे स्तनांचा कर्करोग होऊ शकतो. स्तनामध्ये गाठी आढळणे ही सामान्य बाब आहे. मात्र, काहीवेळा ही गाठ कर्करोगाची असू शकते. कर्करोगांच्या पेशींपासून तयार झालेली ही गाठ हळूहळू पसरत जाऊन आजार बळावू शकतो. त्यामुळे काखेत व मानेत गाठी येतात. कर्करोगाचे निदान झाले की, रुग्णाच्या मनावर आघात होतो. मात्र, रोगाला सकारात्मकपणे स्वीकारले, तर औषधोपचारांचा फायदा होतो. स्तन हे स्त्रीच्या शरीरातील महत्त्वाचे अंग असते. शस्त्रक्रियेद्वारे स्तन काढल्यावर महिलेला मानसिक धक्का बसण्याची शक्यता असते. त्यावर मानसोपचार आवश्यक ठरते.
कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ होय. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशींची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. आयुष्याच्या कोणत्याही कालखंडामध्ये कर्करोग होऊ शकतो. काही प्रकारचे कर्करोग लहान मुलांमध्ये होतात. उदाहरणार्थ डोळ्याच्या दृष्टिपटलाच्या पेशींच्या कर्करोग, बहुतेक प्रकारचे ल्यूकेमिया- रक्ताचे कर्करोग लहानपणी होतात. स्तनांचा, प्रोस्टेट –पौरुष ग्रंथी, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग प्रौढपणी होतो. कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. रोगाचे निदान लवकर झाल्यास शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी केल्याने रोगावर नियंत्रण आणता येऊ शकते. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज ५८ टक्के कॅन्सर बरे होतात किंवा आटोक्यात राहू शकतात. ६३ टक्के कॅन्सरमध्ये उपचारानंतर रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. कोणाला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आणि कोणाला नाही हे मात्र अजून नक्की सांगता येत नाही. कॅन्सर कोणाला होण्याची शक्यता आहे हे मात्र सांगता येते. कॅन्सरचा धोका काही व्यक्तीमध्ये वाढतो. त्याच प्रमाणे काही उपायामुळे कॅन्सर धोक्याचे प्रमाण कमी होते
कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती करणे, माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. कर्करोगविषयक उपलब्ध माहिती तसेच कर्करोगाचे निदान आणि उपचार यात झालेली लक्षणीय प्रगती यांमुळे रोगप्रसारामध्ये कपात होणे अपेक्षित आहे. परंतु जागतिक आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोगाचे नव्याने निदान होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोगाच्या माहितीचा प्रसार करून कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. यासाठी कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने जगभरातील कर्करोग संस्था आणि आरोग्य संघटनांमार्फत जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सु. ७० % मृत्यू हे अल्पविकसित देशांमध्ये होत असल्याकारणाने अशा ठिकाणी कर्करोग आणि त्याचा प्रतिबंध याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक कर्करोग दिवस हे एक महत्त्वाचे साधन आहे.
आपल्या राज्यात कर्करोग विरोधी मोहिम ही युध्दपातळीवर राबविली जाते. शासना मार्फत वेळोवेळी करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमधील कर्करोग तपासणीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे तत्काळ उपचार होण्यास मदत होत आहे. कर्करोगावरील उपचार हे खर्चीक असून रुग्णाला आवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रीया महाग आहेत. त्यामुळे गोरगरीब व सामान्य नागरिकांना या आजाराचा सामना करणे कठीण जाते. मात्र राज्य सरकारच्या ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत’ ९९६ आजारांवर उपचार केले जातात तर पंतप्रधान जीवनदायी योजनेतून 1 हजार 209 आजारांवर उपचार होतात. याशिवाय महापालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना काही विशिष्ट आजारांसाठी लाभ दिला जातो. विशेषत: या योजनेमुळे कॅन्सर ग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक २१.११.२०१३ पासून ही योजना राज्यव्यापी केलेली आहे. दिनांक ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ही योजना सुरु झाली व दिनांक १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.दिनांक २३.०९.२०१८ पासून आयुषमान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबरोबर एकत्रितपणे राबविण्यात येत आहे.
कर्करोगविषयक संशोधन व चिकित्सा करण्यासाठी सर दोराबजी टाटा विश्वस्त मंडळाने टाटा मेमोरियल हॉस्पिटल १९४१ मध्ये मुंबई येथे स्थापन केले. हैदराबाद,मद्रास व कलकत्ता येथेही कर्करोगाचे निदान व चिकित्सा करणाऱ्या संस्था स्थापन झालेल्या आहेत. १९५२ मध्ये कर्करोगविषयक संशोधन करण्यासाठी मुंबई येथे इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर तुर्भे येथील अणुऊर्जा संशोधन संस्थेचेही या संशोधनास सहकार्य लाभले. इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरमार्फत तेथील संशोधनावर आधारलेले अनेक निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. या संशोधनाबरोबरच कर्करोगासंबंधी साधारण जनतेत ज्ञानप्रसार करून शिक्षण देणे व कर्काचे निदान शक्य तितक्या लवकर करून त्वरित उपाय करण्याचे काम देखील या संस्थांमार्फत केले जाते. नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात आलेले कॅटरॅक या संशोधन केंद्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या सहकार्याने आतापर्यंत लाखो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर केमोथेरपी करण्यात आली तर 9 हजारांपेक्षा अधिक रुग्णांना रेडिओ थेरपी उपचार केले गेले आहेत. याशिवाय 5 हजारापेक्षा अधिक कर्करुग्णांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. करोना काळात शासकीय तसेच बहुतेक खाजगी रुग्णालयांनी सामान्य रुग्णांना उपचार नाकारले जात होते. अशावेळी कॅन्सर रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले होते. करोनाच्या भीतीपोटी बहुतेक रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे टाळले जात असताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या रुग्णालयातून ४७ हजार कर्करुग्णांवर झालेले उपचार ही मोठी कामगिरी आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफफुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, ऐनडोक्राईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडीऑलोजी उपचार यांचा लाभ मिळतो. १५५३८८ / १८००२३३२२०० या टोल फ्री नंबर वर लाभार्थी योजनेची माहिती घेऊ शकतात तसेच सेवेबाबत तक्रार करू शकतात. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५० लक्ष पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा २.५० लक्ष आहे.
आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (Union for International Cancer Control, UICC) ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्करोगावर नियंत्रण राखण्यासाठी आणि पर्यायाने जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी कार्यशील असते. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिवसाचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना जागतिक कर्करोग दिवसानिमित्त कर्करोगाशी निगडित रूपरेखा (Theme) जाहीर करते. या रूपरेखेला अनुसरून विविध आरोग्य संस्था आणि कर्करोग उपचार केंद्र यांद्वारे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या संस्थांद्वारे त्यांच्या संकेतस्थळांवर कर्करोगाविषयी माहिती प्रसारित केली जाते. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना स्थानिक आरोग्य संस्थांच्या साहाय्याने संमेलने, व्याख्याने, प्रदर्शने तसेच निधी उभारणी कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. काही देशांमध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांद्वारे ४ फेब्रुवारी किंवा त्या आठवड्यात कर्करोगविषयक विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात.
प्रविण डोंगरदिवे
माहिती सहायक
विभागीय माहिती कार्यालय,