मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ३० जानेवारीलाच त्यांचा ९३ वा वाढदिवस साजरा झाला होता. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत गुरूवारी दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सोलापूर येथे झालेल्या ८८ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांची दोन्ही मुले र्अंजक्य देव आणि अभिनय देव चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.
रमेश देव यांचा जन्म अमरावतीचा, मात्र त्यांचे घराणे हे मूळचे राजस्थानमधील जोधपूरचे होते. त्यांचे कुटुंब नंतर कोल्हापूरात स्थायिक झाले. अभिनयाचे वेड त्यांना लहानपणापासूनच होते, विविध स्टुडिओत फिरून तेथील काम ते पहात असायचे. १९५१ साली आलेल्या ‘पाटलाची पोर’ या चित्रपटातून त्यांनी पहिली छोटेखानी भूमिका केली होती. राजा परांजपे हे त्यांचे गुरू. परांजपे यांनीच त्यांच्यातील अभिनेत्याला संधी दिली, मार्गदर्शन केले, रमेश देव आणि सीमी देव ही जोडी पडद्यावरही यशस्वीपणे उभी राहिली याचे श्रेय ते राजा परांजपे यांनाच देत असत.
पाच ते सहा दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत रमेश देव यांनी २८५ हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० नाटकांमधून भूमिका केल्या होत्या. काळानुसार स्वत:मध्ये बदल घडवत दूरचित्रवाणीचे माध्यमही त्यांनी आपलेसे केले. टीव्ही मालिका, चित्रपट निर्मितीतही ते अग्रेसर राहिले. रमेश देव आणि सीमा देव यांनी ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्रित काम केले होते. या चित्रपटानंतर रमेश देव आणि सीमा देव हे जोडपे कलाकार म्हणून इतके लोकप्रिय झाले की ते दोघे चित्रपटात असतील तर चित्रपट हिट होणार हे समीकरण झाले होते. हेच समीकरण हिंदीतही होते. त्यांनी ‘सुवासिनी’, ‘वरदक्षिणा’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘आलिया भोगासी’ , ‘राम राम पाव्हणं’, ‘एक धागा सुखाचा’, ‘साता जन्माचे सोबती’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या. ‘आरती’ हा १९६२ साली प्रदर्शित झालेला चित्रपट त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून भूमिका केल्या.