डोंबिवली : टिळकनगर विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिकलेल्या आणि सध्या उद्योग व्यवसाय करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांसाठी ‘सव्यसाची’ उपक्रम संस्थेने सुरु केला आहे. सुप्रसिद्ध पत्रकार आणि झी २४ तास वाहिनीचे माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन पार पडले. एखाद्या शाळेने आपल्या व्यावसायिक आणि उद्योजक माजी विद्यार्थ्यांसाठी पहिला व्यावसायिक मंच सुरु करण्याचा डोंबिवलीचा मान असून बहुदा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात हा पहिलाच उपक्रम आहे असे गौरवोद्गार डॉ उदय निरगुडकर यांनी काढले.

टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली आयोजित ‘सव्यसाची’ उपक्रमाचे प्रजासत्ताक दिनी शाळेच्या पेंढरकर सभागृहात उदघाटन पार पडले. डॉ. निरगुडकरांनी ‘बिझनेस नेटवर्किंग ‘ या विषयावर बोलताना कमीत कमी खर्चात तयार होणाऱ्या वस्तू, ग्राहकांची गरज पाहून वस्तू आणि सुविधांचं उत्पादन, अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत अनेक केस स्टडिजचा उल्लेख केला तसेच यशस्वी उद्योजकांबरोबरच व्यवसायात अपयशी झालेल्या लोकांशी संपर्क साधण्याचा व्यवसाय उपयोगी भाग निदर्शनास आणून दिला. तसेच पर्सीसटंट आय टी कंपनीच्या सुप्रसिद्ध उद्योजक व संस्थापक मालक असलेल्या आनंद देशपांडे यांनी तयार केलेल्या टेम्प्लेट्स बद्दल मार्गदर्शनपर माहिती त्यांनी दिली.

या उपक्रमाचे निमंत्रक संदीप वैद्य, तसेच संयोजन समिती सदस्य प्रा. डॉ. विनय भोळे, कमलेश मराठे, नितीन नायक, वृंदा कानेटकर आणि केदार पाध्ये यांचा तुळशीचे रोप देऊन डाँ उदय निरगुडकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रत्येक महिन्यात ‘सव्यसाची’ उपक्रमाअंतर्गत तीन मिटींग्स होतील त्यापैकी एक ऑनलाईन तर दोन प्रत्यक्ष असतील. संस्थेची जागा त्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल.

संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी अध्यक्षीय भाषण केले तर कार्यवाह आशीर्वाद बोन्द्रे यांनी संस्थेची माहिती व सव्यसाची उपक्रमाची संकल्पना मांडली. कार्यवाह अर्चना जोशी यांनी डॉ उदय निरगुडकरांचा परिचय करून दिला. डॉ. विनय भोळे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले तर संदीप वैद्य यांनी आभारप्रदर्शन केले.तसेच माधव जोशी यांनी सव्यसाची मंचास शुभेच्छा दिल्या.

सव्यसाची उपक्रमात इंडस्ट्रियल व्हिझिटस, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन, सभासद होणाऱ्या व्यवसायिकाला स्वतःच्या व्यवसायाचं बिझनेस प्रेझेंटेशन करण्याची संधी दिली जाणार आहे. जास्तीत जास्त व्यावसायिक असलेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सव्यसाची उपक्रमात सहभागी व्हावं असं टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!