मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सदोदित व अव्याहतपणे कार्यरत असणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका प्रतिबंधात्मक आरोग्य विषयक जनजागृती व विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील राबवित असते. याच अंतर्गत येत्या ३० जानेवारीपासून १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंतच्या पंधरवड्यादरम्यान राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत स्पर्श कुष्ठरोग मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये जनजागृतीपर प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर शालेय व महाविद्यालयीन स्तरावर शपथ घेणे, विविध ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करणे, तपासणी शिबिरांचे आयोजन करणे आदी विविध स्तरीय जनजागृतीपर कार्यवाही केली जाणार आहे. त्याचसोबत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध परिसरांमध्ये घरोघर भेटी देऊन सर्वेक्षण देखील केले जाणार आहे. तरी या अनुषंगाने आपल्या परिसरांमध्ये येणाऱया महानगरपालिकेच्या कर्मचारी वा प्रतिनिधींना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी केले आहे.


याबाबत अधिक माहिती देताना डॉ. गोमारे यांनी सांगितले की, कुष्ठरोगाबाबत जनमानसात असलेल्या गैरसमजूती दूर करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ पासून स्पर्श कुष्ठरोग मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कुष्ठरोग क्षेत्रात काम करणारे आरोग्य कर्मचा-यांच्या मार्फत प्रदर्शने, व्याख्याने, हस्तपत्रिका वाटप, पथनाटय, इत्यादी माध्यमांतून कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती देण्यात येते. मुंबई शहर व उपनगरांमध्ये यावर्षीदेखील दिनांक ३० जानेवारी २०२२ ते १४ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम’ राबविण्यात येणार आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत राबविण्यात येणा-या सन २०२१-२२ साठीच्या अर्थात यंदाच्या मोहिमेचे ‘कुष्ठरोगमुक्तीकडे वाटचाल’ हे घोषवाक्य आहे.
आपल्या देशात कुष्ठरोग दूरीकरणाचे उद्दिष्ट सन २००५ मध्ये साध्य झालेले आहे. असे असले तरीही आता कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने आपल्याला सातत्याने अधिकाधिक प्रभावी वाटचाल करावयाची आहे. याच दृष्टीने कुष्ठरोग निर्मूलनाचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेसह कुष्ठरोग क्षेत्रात काम करणा-या सर्व सामाजिक संस्था, राज्यशासन यांचे अथक प्रयत्न नियमितपणे चालू आहेत. कुष्ठरुग्णास वेळेत योग्य ते औषधोपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. यासाठी कुष्ठरोग बाधित झालेल्या व्यक्तिंची वेळेत व लवकर तपासणी होणे गरजेचे आहे. जेणेकरुन, त्यांच्यावर आवश्यक ते औषधोपचार वेळच्यावेळी होऊन ते लवकरात लवकर बरे होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन ‘कुष्ठरोग शोध मोहीम’ व  ‘सक्रिय कुष्ठरोग शोध व नियमित संनियंत्रण मोहीम’ अशा विविध स्तरीय मोहिमा राबविण्यात येत असतात. याच शृखंलेत आता ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम’ राबवून कुष्ठरोग व कुष्ठबाधित व्यक्तींना देखील समाजात मुख्य प्रवाहात सामिल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.


कुष्ठरोग निर्मूलनाचे आपले हे ध्येय लवकरात लवकर साध्य करण्यासाठी जर कुष्ठरोग झाला तर लपविण्याऐवजी अगर घाबरुन जाण्याऐवजी त्यावर योग्य औषधोपचार तातडीने करवून घ्या. कारण लवकर निदान व योग्य उपचारांनी कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होतो. तसेच कुष्ठबाधित व्यक्तींच्या बाबत कोणताही भेदभाव करू नका व इतर कोणी असा भेदभाव करत असेल तर त्यांना त्यापासून परावृत्त करा. ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती ‘मोहीमे अंतर्गत आपल्याला कुष्ठरोगाबद्दल माहिती देणा-या आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करा, असेही आवाहन डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.


कुष्ठरोगाची लक्षणे :-

* न खाजणारा, न दुखणारा लालसर किंवा शरीरावरील त्वचेपेक्षा फिकट रंगाचा चट्टा
* तेलकट गुळगुळीत लालसर त्वचा
* जाड झालेल्या कानाच्या पाळया, कानावरील गाठी
* अंगावरील गाठी
* विरळ झालेले भुवयांचे केस
* हातापायातील बधिरपणा
* हातापायाला वांरवार होणा-या जखमा, विकृती.


*कुष्ठरोगावरील औषधोपचार* :-


कुष्ठरोग हा आजार ‘मायकोबॅक्टीरीअम लेप्रे’ नावाच्या कुष्ठजंतुंमुळे होणारा एक सामान्य आजार असून कुष्ठरोगावर बहुविध औषधोपचार (एम.डी.टी.) पद्धतीने उपचार करण्यात येतात. रुग्णांच्या लक्षणांनुसार कुष्ठरोगाचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार हा ‘सांसर्गिक कुष्ठरोग’ असा असून दुस-या प्रकारास ‘असांसर्गिक कुष्ठरोग’ असे संबोधिले जाते. बहूविध औषधोपचार पद्धती अंतर्गत असांसर्गिक रुग्णांना सहा महिने, तर सांसर्गिक रुग्णांना बारा महिने एवढ्या कालावधीसाठी उपचार घ्यावे लागतात. सदर औषधोपचार महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने व आरोग्य केंद्रांमध्ये, तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *