मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतूक

ठाणे : कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी मास्क आणि दुचाकीस्वारांनी गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करावा याबाबत जनजागृती वाढावी या हेतूने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी, प्रजासत्ताक दिनी मिरारोड ते गेटवे ऑफ इंडिया अशी सायकल फेरी केली. ही फेरी पूर्ण करून परतणाऱ्या या पोलीस सायकलस्वारांनी रेल्वे प्रवासात ताटातूट झालेल्या माय-लेकरांची भेट घडवून आणली. मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी दाखविलेल्या या प्रसंगावधानाचे आणि कर्तव्यदक्षतेचे कौतुक सर्वत्र होत आहे.

प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेली ही सायकल फेरी पूर्ण करून पोलीस कर्मचारी चर्चगेट येथून मिरारोडला येण्यासाठी लोकल रेल्वेने प्रवास करत असताना हा प्रसंग घडला. अंधेरी रेल्वे स्थानकावरून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या डब्यात दोन महिला भांबावलेल्या अवस्थेत बसल्या. भितीने काळजीत पडलेल्या या महिलांची विचारपूस सायकल फेरीसाठी गेलेल्या त्या डब्यातील पोलीस उपनिरीक्षक उज्ज्वल आरके यांनी केली. त्या दोघींपैकी एका महिलेचे नाव सोनी धर्मेंद्र सिंग असल्याचे तिने सांगितले. तिच्याबरोबर असलेली दुसरी महिला ही तिची सासू असल्याचे सांगत त्या महिलेने त्यांच्याबरोबर घडलेला घटनाक्रम पो.उ.नि. आरके यांना कथन केला.

सोनी सिंग ही महिला आपले तीन मुलगे आणि एक मुलगी व सासूबरोबर अंधेरी स्थानकावरून विरारला जाण्यासाठी लोकल डब्यात चढत असताना, त्यांनी आधी चारही मुलांना डब्यात चढवले. परंतु गर्दी जास्त असल्यामुळे सोनी सिंग आणि त्यांची सासू या दोघींना मात्र डब्यात चढता आले नाही. त्यामुळे अनुराग (वय-11), अनुपम (वय-8), अनुज (वय-6) व मुलगी प्रगती (वय-5) ही चार मुले विनापालक विरारच्या दिशेने जाणाऱ्या त्या रेल्वेने पुढे निघून गेली. रेल्वे प्रवासाचा अनुभव नसणाऱ्या चिमुकल्या मुलांशी गर्दीत ताटातूट झाल्याने सोनी सिंग यांना काय करावे हेच सुचत नव्हते. मुले कुठे पोहोचली असतील, याबाबत त्यांच्याशी संपर्क करण्याचा काहीच मार्ग नसल्याने भांबावलेल्या, रडवेल्या झालेल्या स्थितीत या दोघी त्यानंतर आलेल्या लोकलमध्ये चढल्या, आणि त्यांची त्या डब्यात पोलीस कर्मचाऱ्यांशी भेट झाली. त्या दोघींनी सांगितलेला प्रकार ऐकल्यानंतर पो.उ.नि. उज्ज्वल आरके यांनी प्रसंगावधान राखत रेल्वेच्या नियंत्रण कक्षास कळवले आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानकांवरील पोलिसांना याबाबत कळवले. आणि अखेर विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये बोरिवली येथे चारही मुले पोलिसांना सापडली. चारही मुलांची भेट घडवून आणल्याबद्दल आई सोनी सिंग यांनी पोलिसांचे आभार मानले.

या सायकल फेरीत आणि नंतरच्या प्रसंगात पो.उ.नि. उज्ज्वल आरके यांच्यासह विजयकांत सागर (पोलीस उपआयुक्त), विनायक नरळे (सहा. पोलीस आयुक्त), पोनि. राहुलकुमार पोटील, पोउनि. सुहेल पठाण, पोहवा. शंकर उथळे, पोअं. सोमनाथ चौधरी, प्रवीण बंगाळे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्षता निभावली. याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या चमूचे विशेष कौतुक केले.

…………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!