डोंबिवली : टाळेबंदीनंतर हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात आरटीओ आणि वाहतूक पोलिस यांच्यामुळे रिक्षाचालकांना होत असलेल्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी आणि आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मांडण्याकरिता डोंबिवली पूर्वेकडे सांगावच्या पिंपळेश्वर महादेव मंदिरात रिक्षाचालकांसह विविध युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आरटीओ अधिकारी आणि दलाल एकत्र असून कार्यालयात जी फॉर्म भरल्याशिवाय काम होत नाही. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील दलालांपासून सावध रहा, असे आवाहन या बैठकीत उपस्थित रिक्षाचालकांशी संवाद साधताना करण्यात आले.
या बैठकीत कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर भागातून रिक्षा युनियन आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत अनेक मागण्या समोर ठेवण्यात आल्या. परिवहन मंत्री अनिल परब यांना भेटून निवेदन देऊ, मागण्यांवर लवकर निर्णय घेऊ, अन्यथा शहरातील रिक्षा बंद आंदोलन करू, असा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.
लाल बावटा रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष कॉ. काळू कोमास्कर यांनी आरटीओ कार्यालयात दलालांशिवाय जनतेची काम होत नसल्याचे सांगत आरटीओ अधिकारी आणि दलाल एकत्र आले असून जी फॉर्म भरल्याशिवाय कामे होत नाही, असा गंभीर आरोप केला. तर या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर रिक्षाचालकांनी सहभागी होतील असे सांगितले. या बैठकीत रिक्षा परमिट बंद करा, बाटला पासिंगवर नियंत्रण नाही, मीटर पद्धत सुरु करण्यासाठी थांबा आणि कृती कार्यक्रम, बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कारवाई करा, बजाज फायनान्स वसुलीधारकांवर कारवाई करा, अश्या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी संजय देसले, दत्ता माळेकर, तात्या माने, संजय मांजरेकर, आनंद नवसागरे, अंकुश म्हात्रे, उदय शेट्टी, भिकाजी झाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.