डोंबिवली : येथील गजानन कृपा को ऑप हौसिंग सोसायटीमधील टाऊन हॉलचे रूपांतर, रूग्णालय/वैद्यकिय केंद्र असा वापरात बदल करण्याचा घाट केडीएमसीने घातला आहे. आधीच टाऊन हॉलमुळे सोसायटीतील रहिवाशी त्रस्त झाले असतानाच, आता हॉस्पीटलमुळे रहिवाशांची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे. त्यामुळे रहिवाशांची सुरक्षा आणि शांतता धोक्यात येणार असल्याने सोसायटीने यावर आक्षेप घेत विरोध दर्शविला आहे. सोसायटीतील रहिवाशांनी महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यासह थेट राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री डॉ विजयकुमार गावित, सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे न्यायासाठी साकडं घातलं आहे.
डोंबिवली पूर्वेतील संत नामदेव पथावरील गोग्रासवाडी परिसरात गजानन कृपा को ऑप हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर दोन प्लॅट आणि एक टाऊन हॉल महापालिकेसाठी राखीव आहे. सोसायटीतील रहिवाशी आणि टाऊन हॉलमध्ये ये जा करण्यासाठी एकाच ठिकाणाहून प्रवेशद्वार आहे. त्यामुळे रहिवाशांसह बाहेरील व्यक्ती सोसायटीच्या कंपाऊमध्ये प्रवेश करताना त्यांची ओळख पटवणे वॉचमनला कठीण जात आहे. तसेच बाहेरील व्यक्ती आणि वॉचमनमुळे नेहमीच खटके उडत असतात. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोवीड काळात टाऊन हॉलमध्ये क्वारंटाईन केंद्र सुरू करण्यात येणार होते मात्र रहिवाशांनी विरोध केल्याने ते होऊ शकले नाही मात्र आता टाऊन हॉलमध्ये हॉस्पीटल केले जात असल्याने सोसायटीने यावर आक्षेप घेतला आहे.
इमारतीच्या स्ट्रक्चरमध्ये बदल धोकादायक ?
गेल्या सहा महिन्यांपासून टाऊन हॉलमध्ये नुतनीकरण आणि फर्निशिंगचे काम सुरू आहे. तसेच त्या ठिकाणची भिंत काढून मेाठी खिडकी बनवण्यात आली आहे. इमारतीचा दर्शनीभाग बदलण्यात आला आहे पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या बेजबाबदार कृतीमुळे इमारतीच्या रचनेत झालेल्या बदलामुळे इमारतीला धोका निर्माण झाला असून रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले असल्याचे रहिवाशांनी पत्रकात म्हटले आहे. तसेच सोसायटीला कोणतीही सुचना न देता पूर्णपणे अंधारात ठेवून पालिकेकडून काम केले जात आहे. तसेच टाऊन हॉलची रचना उंच पाय-यांसह आणि लिफटची कोणतीही सुविधा नाही मग ती रूग्णांसाठी योग्य ठरेल का ? तसेच सोसायटीच्या आवारात येणारे रूग्ण आणि वाहने यामुळे सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनणार आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय तातडीने बदलण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोसायटीच्या रहिवाशांनी दिला आहे.
वॉचमनवर जीवघेणा हल्ला …
सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये बाहेरील व्यक्तींची नेहमीच ये जा होत असे, त्यावेळी एका प्रसंगात बाहेरील व्यक्तींकडून वॉचमनवर प्राणघातक हल्ला करून जखमी करण्यात आले होते. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. तसेच यापूर्वी टाऊन हॉलमध्ये महापालिकेने एलबीटी कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर पालिकेने आधारकार्ड केंद्रही सुरू केले होते. मात्र सुरक्षेच्या कारणावरून वॉचमनने सोसायटीत काम करण्यास नकार दिला. तसेच सोसायटी कंपाऊंडमधील दोन गाडया पंक्चर करण्यात आल्या अशा अनेक प्रसंगांना रहिवाशांना सामोरे जावे लागल्याचे सोसासटीने पत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे टाऊन हॉलमध्ये हॉस्पीटल झाल्यानंतर रहिवाशांची शांताता आणि सुरक्षितता धोक्यात येणार आहे असे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेने सहानुभूतीपूर्वक विचार करून इतर ठिकाणी रूग्णालय सुरू करावे अशी मागणी रहिवाशांनी राज्य सरकार आणि पालिकेकडे केली आहे.
————–