डोंबिवली : समाज कितीही सुशिक्षित झाला असला तरी सुध्दा समाजात अंधश्रध्देचे अनेक प्रकार घडताना दिसतात, असाच एक प्रकार डोंबिवलीसारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नगरीत उजेडात आलाय. करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली जळगावच्या एका भोंदूबाबाने त्या कुटूंबाला तब्बल ३२ लाख १५ हजार ८७५ रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक घटना उजेडात आलीय.
डोंबिवली पूर्वेतील न्यू आयरे रोड परिसरात राहणाया एका वृध्द महिलेची फसवणूक झाली आहे यासंदर्भात कळवा येथे राहणा़या त्या महिलेच्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय या तक्रारीनुसार पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातल्या भडगावातील गंजेवाडा-शनि चौकात राहणारा पवन पाटील नामक भोंदूबाबा विरोधात भादंवि कलम 420, 406, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013 चे कलम 2 (1), (ख), 3 (1), (2) अन्वये गुन्हा दाखल केलाय.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर 2019 पासून आजतागायत पवन पाटील (28) या भोंदूबाबाने त्यांच्या आईच्या खात्यातून लाखो रूपये ट्रान्सफर केले आहेत त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकु व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा काढून दाखवली. तसेच तुम्हाला कुणीतरी करणी केल्याची भीती घातली. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या बाबाने आपल्या व आईचे खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये 31 लाख 6 हजार 874 रूपये इतके पैसे ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर करवून घेतले. तसेच आपल्याकडून 1 लाख 9 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. अशाप्रकारे या पवन पाटील याने 32 लाख 15 हजार 874 रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश सरडे अधिक तपास करत आहेत.