डोंबिवली :  देशभरात 20 हून अधिक गुन्हे करून गेल्या 5 वर्षांपासून फरार असलेला इराणी गँगच्या अट्टल गुन्हेगाराला कल्याणच्या इराणी वस्तीतून जेरबंद करण्यात मानपाडा पोलिसांना याश आले आहे. हसनैन गुलामरजा सैय्यद उर्फ इराणी (28) असे अटक करण्यात आलेल्या लुटारूचे नाव असून कल्याण कोर्टाने अधिक गुन्ह्यांची उकल करण्याकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
 विशेष म्हणजे पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून 2 मोबाईल, 2 दुचाक्या, 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या पाटील नगरमध्ये कुख्यात गुन्हेगार लपला असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त जयराम मोरे, पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल भिसे, फौजदार सुनिल तारमळे यांच्यासह सुधीर कदम, सोमनाथ ठिकेकर, संजू मासाळ, सुधाकर भोसले, शांताराम कसबे, अशोक आहेर, सोपान काकड, प्रशांत वानखेडे, अशोक कोकडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, तारांचद सोनवणे, रश्मी पाटील आणि सोनाली किरपण या पथकाने मंगळवारी संध्याकाळी पाटील नगरमध्ये जाळे पसरले. तेथिल एका टपरीजवळून हसनैन सैय्यद याला ताब्यात घेतले. 20-25 महिला व पुरूष इराण्यांनी पोलिसांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा डाव उधळून लावत आंतरराज्यीय स्तरावरील हसनैनला जेरबंद केले. कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या बांधल्याने मानपाडा पोलिसांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे.   हसनैन सैय्यद याच्याविरोधात 2016 सालात भादंविक 394, 34 सह मोक्का कायद्याचे कलम 3 (2) (ii) 3 (2) 3 (4) 3 (5) अन्वये पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी कारवाईही केली होती. यात जामीन मिळाल्यानंतर हसनैन सैय्यद याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या.
   

मानपाडा, नारपोली, शिवाजीनगर, रबाळेसह बँगलोर सिटी अशा 5 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 8 गुन्हे करणाऱ्या या आरोपीच्या विरोधात  खडकपाडा, वागळे इस्टेट, खांदेश्वर, खारघर, सातारा शहर पोलिस ठाणे, हडपसर, कोथरूड अशा पोलिस ठाण्यांतून तब्बल 20 गुन्हे दाखल असल्याची माहिती एसीपी जयराम मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!