शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी हात टेकले
वरिष्ठ बळ देत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार


ठाणे- वसई-विरार महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा शिवसेना लढवणार, अशी छातीठोक गर्जना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांनी केली असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून बळच मिळत नसल्याने सामान्य शिवसैनिकांनी हात टेकले आहेत. परिणामी वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुका शिवसेनेकरता ‘अवघड जागेचं’ दुखणं ठरण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांत वसई-विरार महापालिकेच्या पायरीवरील धूळ झाड़णाऱ्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार राजेंद्र गावित व संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांनी सामान्य शिवसैनिकांना मात्र भेट, वेळ, प्रेरणा किंवा त्यांच्याशी संवाद साधला नसल्याच्या तक्रारी आहेत. 


वसई-विरार शहराची पक्षीय जबाबदारी शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. कोविड काळात एकनाथ शिंदे केवळ एकदा वसई-विरार शहरात आले. पालकमंत्री दादाजी भुसे यांचे सात-आठ दौरे झाले; मात्र हे दौरे पालिका अधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठका व विकासकामांच्या पाहणीपुरताच मर्यादित राहिले आहेत. खासदार राजेंद्र गावित अधूनमधून येतात. पण शिवसेना कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतील इतकी ताकद त्यांच्या ‘शब्दा’त नाही.  शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांचीही स्थिती काही वेगळी नाही. ते संपर्कप्रमुख असले तरी कार्यकर्त्यांशी त्यांची अद्याप ‘नाळ’ जुळलेली नाही. पालकमंत्री, खासदार व संपर्क प्रमुख वसई-विरार महपालिकेत येतात; पण कशासाठी? याचे कोड़े शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिकांना अद्याप उलगड़लेले नाही. 

विशेष म्हणजे वसई-विरारमधील प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून शिवसेना नेते एकनाथ शिंदे पालिकेवर वर्चस्व ठेवून आहेत. मात्र त्यानंतरही शिवसेना सामान्य वसई-विरारकरांना न्याय देऊ शकलेली नाही. किंवा त्यांच्या समस्या धसास लावू शकलेली नसल्याच्या तक्रारी खुद्द शिवसेनेचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. वसई-विरार शहरातील पाच-सहा पदाधिकारी सोडले तर या नेत्यांकडून सामान्य शिवसैनिकांची दखलही घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. संपर्कप्रमुख आमदार आहेत. पालकमंत्री कृषिमंत्रीही आहेत; पण वसईतील किती पदाधिकाऱ्यांची नावे हे लोक सांगू शकतील? असा प्रश्न कार्यकर्ते करताना दिसत आहेत. 


शिवसेनेचे वरिष्ठ नेते वसई-विरारमध्ये येतात; पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांकडे बसतात; पण ही किंमत शिवसेना पदाधिकाऱ्यांना मिळत नाही. सामान्य शिवसैनिकांना तर तलाठी, वॉर्ड अधिकारीही विचारत नसल्याचे सामान्य शिवसैनिकांचे दुःख आहे. घोड़बंदर ते सकवार आणि मेढ़े ते अर्नाळा या २४ लाख लोकसंख्येच्या पट्टयात शिवसेना पदाधिकारी, महिला आघाड़ी, युवासेना आणि शिवसेनाप्रणीत अंगीकृत संघटना यांचे हजारो पदाधिकारी आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांनी हे सगळे प्रेरित असले तरी या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ नाही. वसई-विरारकरांमधील सामान्य नागरिकांबाबत शिवसेनाही ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिकांना पर्याय मिळत नसल्याची वेदना शिवसैनिक खासगीत व्यक्त करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *