बीएसयुपी योजनेत घोळ :  राजकीय बगलबच्चांना घरे, खरे लाभार्थी वंचित ? काँग्रेसचा खळबळजनक आरोप 

डोंबिवली : बहुचर्चित व वादग्रस्त ठरलेली केडीएमसीची बीएसयुपी योजना पून्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे. बीएसयुपी योजनेत खरे लाभार्थीं हे हक्काच्या घरापासून वंचित राहिले असून काही राजकीय मंडळींनी आपल्या बगलबच्च्यांना घरे दिल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष केणे यांनी केलाय. त्यामुळे पालिका आयुक्तांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता बीएसयुपी योजनेतील ख-या  लाभाथींना त्यांच्या हक्काची घरे द्यावीत अशी मागणी केणे यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केलीय. मात्र बीएसयुपी योजनेतील गरीबांची घरे लाटणारी ती राजकीय मंडळी कोण ? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

झोपडपट्टीत राहणा-या गोरगरीब जनतेचे राहणीमान सुधारावे त्यांना  हक्काची घरे मिळावीत या हेतूने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जेएनएनयूआरएम अंतर्गत बीएसयुपी योजना अंमलात आणली. सदर योजना केडीएमसी क्षेत्रात राबविण्यात यावी यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांच्याशी चर्चा करून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला, हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केल्यानंतर नगरसेवक या नात्याने स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना विनंती करून ही बीएसयुपी योजना मंजूर करून घेण्यात यश मिळवले. केडीएमसीत ही योजना राबविण्यात आली, मात्र ठेकेदारांकडून अटीशर्थींचा भंग करून ख-या लाभाथ्र्यांच्या यादीत घोळ करून त्यांना वंचित ठेवण्याचे कारस्थान करण्यात आला. त्यावेळी १९ मार्च २०१० रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली हेाती, त्या तक्रारीची दखल घेत या योजनेची चौकशी करण्यासाठी जेएनएनयूआरएम चे मॉनिटरींग चिफ इंजिनिअर सुब्रोतो मुखोपाध्याय यांची नेमणूक करण्यात आली त्यानुसार त्यांनी सर्व योजनेची स्वत: पाहणी करून तसा अहवाल सादर केलेला आहे असे केणे यांनी पत्रात म्हटले आहे.  

आम्हाला मतदान करा, अन्यथा घरे मिळणार नाही ….


काही राजकीय मंडळींकडून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी बीएसयुपी प्रकल्पात ख-या लाभाथ्र्यांना त्यांचे हक्काचे घर न देता आपल्या बगलबच्यांना घरे देण्यात आली आहेत असा आरोप केणे यांनी केलाय. तसेच मागील निवडणुकीत काही  राजकीय मंडळींनी तेथील लाभार्थींना निवडणुकीत आम्हाला मदतान करा, अन्यथा तुम्हाला घरे मिळणार नाही अशी भिती दाखवून राजकीय पोळी भाजून घेतली हेाती अशी चर्चा लाभाथ्र्यांमध्ये सुरू असल्याचे केणे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे मात्र केाणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे राजकीय मंडळी कोण ? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.


…… पून्हा चौकशी लावावी लागेल….

दत्तनगर या ठिकाणी राबविण्यात आलेल्या योजनेत खरे लाभार्थी कसे वंचित राहिले यांची माहिती आपणास देण्यात आली आहे. आता पालिकेकडून पून्हा सर्वे करण्यात येणार आहे. त्यामुळे वंचित राहिलेल्या ख-या लाभार्थींना न्याय देऊन हक्काची घरे त्यांना मिळावीत यासाठी प्रयत्न करावेत, कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडून ख-या लाभाथ्र्यांना वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय झाल्यास पून्हा चौकशी लावावी लागेल असा इशाराही केणे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *