महापौरांची डंपिंग ग्राऊंडवर धडक, पर्यायी रस्ता तयार करण्याचे आदेश
कल्याण : येथील आधारवाडी डंपिंग ग्राऊंडकडे जाणारा रस्ता खराब झाल्याने कच-याच्या गाडयांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत त्यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे याची दखल घेत बुधवारी मुसळधार पावसात महापौर राजेंद्र देवळेकर यांनी डंपिंग ग्राऊंडवर धडक देत पर्यायी रस्ता तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कच-याचा ढीग आहे. गेले देान दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने डंपिंग ग्राऊंडवरील रस्ता बंद झाला आहे त्यामुळे कचरा गाडयांमधील कचरा खाली होत नसल्याने महापालिका परिसरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने गाड्यांची रांग थेट दुर्गाडी चौकापर्यंत पोहचली आहे . त्यामुळे वाहतूक कोंडीचा सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. कचरा उचलण्यास सुद्धा विलंब होत असल्याने महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आज भर पावसात डम्पिंग ग्राऊंड परिसराचा दौरा करत केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. डम्पिंग ग्राऊंडवर जागा नाही आणि तिथे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल आणि पाणी साचल्याने अडचण येत आहे. त्यामुळे त्वरीत हा रस्ता तयार करण्याचे आदेश महापौरांनी दिले. तोपर्यंत डंपिंग ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या ट्रक टर्मिनलच्या जागेतून गाडया नेऊन डंपिंग ग्राऊंडवर खाली कराव्यात असेही महापौरांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांच्यासमवेत घनकचरा विभागाचे उपायुक्त तोरस्कर, कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा आदी अधिकारी उपस्थित होते.
——-