मुंबई: दलित चळवळीला स्मारके आणि प्रतिकांच्या भावनिक प्रश्नांच्या सापळ्यातून बाहेर काढून मागास समाजांच्या अस्सल प्रश्नांवर लढायला सिद्ध करणारा २७ कलमी एक अजेंडा (उद्या) महापरिनिर्वाण दिनी ‘आंबेडकरी संग्राम ‘ तर्फे चैत्यभूमीवर प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर तो अजेंडा तिथेच वाटप करून राज्यभरातून येणाऱ्या आंबेडकरी जनतेच्या हाती दिला जाईल,अशी माहिती आंबेडकरी संग्रामचे अध्यक्ष प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी आज दिली.
नागपूरच्या सरकारी रुग्णालयासाठी वळवण्यात आलेले सामाजिक न्याय खात्याचे तब्बल ८७५ कोटी रुपये परत मिळावेत,या मागणीसाठी आंबेडकरी संग्रामने जंग छेडले आहे. त्यासाठी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सकाळी ११ वाजता स्वाक्षरी अभियानाचा प्रारंभ होणार आहे. या अभियानातच २७ कलमी अजेंड्याचे प्रकाशन करण्यात येईल, असे त्यांनी एका पत्रकात म्हटले आहे.
आनंदराज आंबेडकर येणार
उद्या अभिवादनासाठी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने या, अशी हाक आंबेडकरी जनतेला देणारे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर हे स्वतः स्वाक्षरी करून आंबेडकरी संग्रामच्या मागणीला आणि राज्यव्यापी अभियानाला पाठिंबा देणार आहेत. रिपब्लिकन सेनेचा यात सक्रिय सहभाग राहणार आहे, असे मुंबई प्रदेश अध्यक्ष, कामगार नेते रमेश जाधव यांनी जाहीर केले आहे.
कर्मचारी संघटना, वकिलांचाही पाठिंबा
या अभियानात पँथर चळवळीतील एक ज्येष्ठ नेते सयाजी वाघमारे, बँक कर्मचारी नेते सतीश डोंगरे, प्राचार्य रमेश जाधव, प्रा एकनाथ जाधव, राजकीय विश्लेषक सुनील कदम, भारतीय वनाधिकारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष डोंगरे, ‘बानाई’ या इंजिनिअर्स संघटनेचे माजी अध्यक्ष कुलदीप रामटेके, फोरम ऑफ एससी/ एसटी बँक एम्प्लॉईज असोसिएशन्सचे उप महासचिव शरद कांबळे, सेन्ट्रल बँक बहुजन समाज एम्प्लॉईज युनियनचे नेते पंजाबराव बडगे, परिवहन कर्मचारी नेते सुरेंद्र सरतापे, अशोकराव कांबळे, रमेश मोकळ, गौतम सोनावणे, बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर,प्रा शाहू ओव्हाळ, प्रा अलका सुर्यवंशी, प्रा मच्चीन्द्र तिगोटे,ऍड सिद्धांत सरवदे, ऍड अमित कटारनवरे, ऍड प्रज्ञेश सोनावणे, कबीर हिवराळे, महापालिका कामगार नेते सीताराम लव्हांडे हे सहभागी होणार आहेत.