काळू नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु
कल्याण : कल्याण तालुक्यातील काळू नदीच्या पात्रात बुडून एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अर्पित पांडे असे या मुलाचे नाव असून तो टिटवाळा पश्चिमेतील सिद्धिविनायक चाळीत राहणारा होता. आज रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या एक तासाच्या अथक परिश्रमानंतर अर्पितचा मृतदेह हाती लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमाराला अर्पित हा त्याचे मित्र अरमान, आशिष व चेतन यांच्याबरोबर सांगोडा येथील स्मशानभूमीलगत असलेल्या काळू नदीवर आंघोळीसाठी गेला होता. तो आंघोळीसाठी पाण्यात उतरला मात्र पात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने अर्पित नदी पात्रात बुडाला. या घटनेमुळे त्याच्या समवेत असलेल्या अन्य तिघा मित्र भयभीत झाले. यामुळे त्यांनी या घटनेची माहिती कोणालाही दिली नाही. त्यामुळे अर्पित बराच वेळ उलटूनही घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांकडे विचारणा केली असता रात्री आठ वाजता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. यानंतर स्थानिक युवक किरण पाटील यांच्या समवेत अन्य सहकारी, रहिवाशी व टिटवाळा पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध घेतला. मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबली होती. आज रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या एक तासाच्या अथक परिश्रमानंतर अर्पितचा मृतदेह हाती लागला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीच भाऊबिजेच्या दिवशीही एकाच कुटुंबातील ३ मुलांचा याच नदीत बुडून करून अंत झाला होता. ही दुसरी दुर्दैवी घटना घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येथे सूचना फलक अथवा तारेचे कुंपण लावण्याची मागणी नागरिक करीत आहे.