मुंबई : आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युतीची चर्चा रंगली असतानाच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली या भेटीदरम्यान दोन्ही पक्षांत काय चर्चा झाली हे समजू शकले नसले तरी तर्कवितर्क लढविले जात आहेत त्यामुळे शिवतीर्थावर राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे
राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच शिवतीर्थ या नव्या घरात राहावयास गेले आहेत. दादर येथील कृष्णकुंजशेजारीच शिवतीर्थ हे नवं घर आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या नव्या घरात प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता यांच्यासह नव्या घरात राज ठाकरेंच्या भेटीला पोहचले होते. मात्र या भेटीची चर्चा गुलदस्त्यात आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी आणि देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी मुंबई महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी आता मनसे आणि भाजप युतीची चर्चा रंगली आहे. बीएमसीवर गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ८२ तर शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. स्थानिक स्वराजय संस्थेची निवडणूक असो वा विधानसभेची निवडणूक भाजप मनसेच्या युतीची चर्चा रंगली आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून दुजोराही देण्यात आलेला नाही परंतु नकारही देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबरोबर भाजप नेत्यांच्या भेटी वाढल्याने मनसे भाजप युतीची नवी मोट बांधली जाणार का ? अशीच चर्चा रंगली आहे.