राम मंदिर आयोध्येतच होईल : खासदार सुब्रमण्यम स्वामी
डोंबिवली : ‘ रामाचा जन्म जिथे झाला त्याच जागी कोणाही हिंदू भक्ताला ईश्वरप्रार्थना करण्याचा भारतीय राज्यघटनेनुसार अधिकार आहे आणि म्हणूनच आयोध्येतच, त्याच जागी मंदीर होईल याबाबत तिळमात्र शंका नाही असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार सुब्रमनियन स्वामी यांनी डोंबिवलीत केले. ‘ मुस्लिम बांधवांसाठी आम्ही आदरपूर्वक अन्य ठिकाणी प्रार्थना स्थळांसाठी जागा नक्की मिळवून देऊ.’ अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली.
” भारत-उभरते जागतिक नेतृत्व, अर्थात, एक पाऊल रामराज्याच्या दिशेने ‘ या विषयावर व्याख्यान देताना स्वामी बोलत होते.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पश्चिम आणि सुब्रमनियन स्वामींच्या चाहत्यांनी स्थापन केलेल्या ‘ विराट हिंदुस्थान संगम ‘ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी डोंबिवली येथील ब्राह्मणसभेच्या सभागृहात ‘ विषय-वेध व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्पाच्या प्रसंगी स्वामी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. ब्राह्मण सभा,रोटरी आसनी वि.हीं.सं.या संस्थांतर्फे अनुक्रमे पुष्पगुच्छ ,शाल श्रीफळ मानपत्र आणि विवेकानंदांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर के.शिवराज,राज्यमंत्री रविंन्द्र चव्हाण,डॉ.उल्हास कोल्हटकर, डॉ.अजय संख्ये इ.मान्यवरांनी हा सत्कार प्रदान केला. ब्राह्मणसभेच्या तळमजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावर श्रोते मोठ्या एलईडी पडद्यावर मोठ्या संख्येने स्वामींचे भाषण पाहत होते आणि दुसऱ्या मजल्यावरील स्वामींचे भाषण प्रत्यक्ष पाहणाऱ्या श्रोत्यांनी सभागृह तुडुंब भरले होते.
बिहारी लोकांवर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांचे आणि यूपीतील टॅक्सीचालकाचे डीएनए हे एकच असल्याचा दावा करून स्वामींनी कोणत्याही धर्माच्या भारतीय नागरिकांचे डीएनए सारखेच असल्याचेही स्पष्ट सांगितले. रामायणातल्या रावणाचा जन्म मूळचा दिल्लीजवळच्या नोएडाचा व पत्नी मंदोदरीचं माहेर मेरठ असल्याचेही स्वामींनी सांगितले. या व्याख्यानात स्वामींनी कै. जवाहरलाल नेहरू, यांचे लेडी माउंटबॅटन यांचे संबंध, सोनिया गांधींचं इटालियन मूळ , काश्मीर प्रश्नाचं भिजतघोंगडं या विषयांच्या यशापयशाची कारणमीमांसा विशद केली.
आपल्या सव्वा तासाच्या वक्तव्यात स्वामींनी सर्वधर्मसमभाव, स्वातंत्रोत्तर जातीय, धार्मिक विद्वेषाचे राजकारण, हिंदू धर्माची सहिष्णू पण टिकाऊ धारणा, संस्कृत भाषा, योगा, चातुर्वर्ण्य व्यवस्था अशा अनेक मुद्द्याना स्पर्श केला. रोटरीचे अध्यक्ष दीपक काळे, वि. हिं. संगमचे जगदीश शेट्टी, सुधीर जोगळेकर हे मान्यवरही याप्रसंगी उपस्स्थित होते. या व्याख्यानाच्या प्रसारणाची सोय यू ट्यूब आणि फेसबुकवर केलेली असल्याने जगभरच्या लाखो श्रोत्यांना या व्याख्यानाचा लाभ घेता आला. एलईडी स्क्रीन,ध्वनियोजना करणारे रो.दिलीप भगत,सचिव के.सुब्रमनियन,सूत्रसंचालक रो.विनोद दशपांडे,प्रकल्प प्रमुख रो.विनय देगावकर,सहसचिव रो.दीपाली पाठक,रो.मंदार कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.