युएनएफपीएच्या शिष्ट मंडळाची ठाणे आरोग्य विभागास भेट ;
लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या केल्या सूचना
ठाणे ( नितीन पंडित ) देशाच्या विकासासाठी लोकसंख्या नियंत्रित असणे काळाची गरज आहे त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी शासन स्थरावर जोरदार प्रयत्न सुरु आहेत . ठाणे जिल्ह्यात लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाची अंमल बजावणी योग्य व प्रभावी पणे होते किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी दिल्ली येथील युनायटेड नेशन फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीज (युएनएफपीए) अर्थात संयुक्त राष्ट्र संघटनेचा लोकसंख्या नियंत्रण विभाग या विभागाच्या शिष्ट मंडळाने शनिवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास भेट दिली . युएनएफपीएच्या या शिष्ट मंडळात डॉ अनुजा गुलाटी , डॉ शुभश्री , श्रीमती रेणु खन्ना यांचा समावेश होता . दरम्यान या शिष्ट मंडळाने ठाणे सामान्य रुग्णालयाला भेट दिली . यावेळी ठाणे जिल्ह्यातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला . याप्रसंगी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी एस सोनावणे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ केम्पी पाटील यांनी युएनएफपीएच्या शिष्ट मंडळास ठाणे जिल्ह्यातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाची माहिती दिली . ज्यात तांबी वाटप , निरोध वाटप , स्त्री पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया , इंजेक्शन द्वारे देण्यात येणारी कुटुंब नियोजनाची अंतरा पद्धती तसेच गर्भपात सेवा , अर्श व मैत्री क्लिनिक तसेच १०८ व १०२ रुग्ण सेवा तसेच कुटुंब नियोजनासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली . यावेळी युएनएफपीएच्या शिष्ट मंडळाने कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी आवश्यक माहितीचा आढावा घेतला . सदरचा अहवाल केंद्र व राज्य सरकार कडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान ” युएनएफपीएच्या शिष्ट मंडळाने ठाणे जिल्हा आरोग्य विभागाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केला असून यासंदर्भात काही सूचना देखील आपणास दिल्या आहेत ” अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी एस सोनावणे यांनी दिली आहे .