ठाणे : एसटी कामगारांच्या आंदोलनावरूनही पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. एसटी कामगारांच्या आंदोलनामागे भाजपचे नेते आहेत हे आता उघड झालं आहे असं सांगत एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातलं वातावरण भाजपकडून गढूळ केलं जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे. यावेळी पटोले यांच्या नेतृत्वातील कल्याणात पदयात्रा काढण्यात आली. कल्याणच्या सहजनानंद चौकात महागाई विरोधात आकाशात काळे फुगे सोडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, ब्रीज दत्त, कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह पदाधिकरी उपस्थित होते.
प्रदेश अध्यक्ष पटोले यांनी कल्याणनंतर बदलापूर आणि अंबरनाथ शहरांचा दौरा केला यावेळी एसटी संपाविषयी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकार एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. एसटी कामगारांना न्याय नक्की मिळेल, पण त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, कारण संपामुळे त्यांचं नुकसान होईल, असं आवाहन पटोले यांनी केलं.
पटोले यांनी भाजपवर टीका केली. राज्यात भाजप हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करत असून याचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केला.