भिवंडी – लाखीवली गाव…आदिवासी बहुलवस्तीचे छोटस गाव.. भिवंडीपासून अवघ्या १५ किमीवर असलेल्या या गावाला लागून जंगल आहे. पावसाळा-हिवाळा संपला की, लोकाना आणि जंगलातील प्राण्याना पाण्यासाठी शोध सुरू होतो. गावासाठी टँकरचे देखील पाणी येते पण ते सगळ्याना पुरत नाही. येथील गावकरी व वन्य जीवांचे पाण्यावाचून होणारे हाल पाहून भिवंडी लायन्स क्लबने निर्धार केला ते पाण्याचा साठा वाढवण्याचा. लायन्स क्लबच्या अध्यक्षा शीतल सुधीर देशमुख व लायन्स क्लबचे कमिटी अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या संकल्पनेतून वनराई बंधारा बांधण्याची योजना पुढे आली.
गावाजवळून वाहत असलेल्या ओढ्यावर वनराई बंधारा (चेक डॅम) बांधला तर, उन्हाळ्यात किमान पाणी मिळू शकेल या विचाराने लायन्स क्लब भिवंडीच्या सदस्यानी त्यांच्याकडील ७५ हजार रूपये जमा केले. बंधारा बांधायचा तर, त्यासाठी किमान १००० गोणी लागणार होती. ती देखील जमा झाली आता गरज होती मनुष्यबळाची. आणि लायन्सच्या सोबत आले अनेक हात. लिओ क्लब ऑफ भिवंडी, दांडेकर विद्यालय, पंचायत समिती भिवंडी, टिळक चौक मित्र मंडळ, सह्याद्री पतसंस्था अश्या अनेक संस्थांचे पदाधिकारी पुढे आले आणि रविवारचा दिवस श्रमदान करून १०० मीटर लांबीचा वनराई बंधारा बांधण्यात आला. या बंधारामुळे परिसरातील शेतीला व बाजूला असलेल्या जंगलातील वन्य प्राण्याना आता पाणी उपलब्ध झाले.
लायन्स क्लबच्या जयश्री पाटील, किरण कोकणी, सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास थळे, जिल्हा परिषद शिक्षीका सुमती सुनिल पाटील, लिओ अध्यक्ष स्नेहा आडप, सचिव सुरज गुज्जा, दांडेकर विद्यालयचे मुख्याधापक वाघ सर, दिनेश पाटील, लायन सचिव हेमेंद्र जैन यांचे मोलाचे सहकार्य वनराई बंधाराच्या कामात लाभले.