ठाणे (प्रतिनिधी)- एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता पूर्णपणे कर्मचारी संघटनेच्या हातून निसटला आहे. या संपाचा फायदा भाजपच्या आमदारांकडून घेतला जात आहे. कामगारांना भडकावून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप भटके-विमुक्त, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. दरम्यान, सरकारने चार पावले पुढे यावे तर कामगारांनी दोन पावले मागे येऊन आपले हित कशामध्ये आहे, हे लक्षात घ्यावे; एसटी संपावर खासगीकरण हा उपाय नाही, असेही राठोड यांनी म्हटले आहे.


एसटी कर्मचाऱ्याकडून पुकारलेल्या संपाबाबत हरिभाऊ राठोड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. एसटीच्या खासगीकरणाचा फटका जसा कर्मचाऱ्यांना बसणार आहे. तसाच प्रवाशांनाही बसणार आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आपले हित ओळखून दोन पावले मागे यावे, असे आवाहनही राठोड यांनी केले. यावेळी कास्ट्राईब संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे उपस्थित होते.

राठोड म्हणाले , एस टी कामगारांच्या संपाचा राजकिय फायदा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम विरोधकांकडून चालु आहे. एसटीमध्ये सर्वाधिक बहुजन वर्गातील म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हिजेएनटी समूहाचे लोक नोकरी करीत आहेत. या वर्गाच्या हिताकडे पाहण्याऐवजी राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे .दुसरीकडे या संपावर तोडगा काढण्या ऐवजी खासगीकरणाबाबत सुतोवाच केले आहे. त्यामुळे आता “भीक नको पण कुत्रा आवर”अशी परिस्थिती कामगारांची झाली आहे. कामगारांनी हे कटकारस्थान ओळखून आपले हित कशात आहे, याचा विचार करून खासगीकरण व विलीनीकरण या दोन्हीं गोष्टीं बाजूला ठेऊन मध्यम मार्ग काढण्यासाठी दोन पावले मागे जाणे गरजेचे आहे. तर सरकारने चार पाऊले पुढे जावून बहुजन वर्गातील कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *