कल्याण : देशाच्या स्वातंत्रयाबद्दल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतवर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंगनाचा पद्मश्री पुरस्कार काढून घेऊन तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली असून आज कल्याण शहर जिल्हा काँग्रेसतर्फे आज पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.
देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणुन मिळाले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कंगना राणावतने केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या क्रांतिवीर आणि महात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे रक्त सांडून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा इतिहास संपविण्याचे काम कंगना राणावत करीत असल्याचे काँग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच कंगना राणावत नेहमीच बेताल वक्त्यव्य करून देशाच्या ऐकतेमध्ये फूट पाडण्याचे आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करीत असून वेळीच तिला आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे कंगना राणावतला दिलेला पद्मश्री पुरष्कार काढून घेऊन तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष केणे, कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.