मुंबई : धार्मिकदृष्ट्या महत्व असलेली, बहुपयोगी आणि बहुगुणी तुळस ही वनस्पती ‘ क्वीन ऑफ हर्ब्स’ अर्थात औषधांची राणी म्हणून ओळखली जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या सर्व रोपवाटिकांमधून मिळून सन २०२०-२१ या कालावधीत तुळशीची सुमारे ५२ हजार रोपे विकण्यात आली. कोविड संसर्ग कालावधीत काही सामाजिक उपक्रमांसाठी तुळशीच्या रोपांचे विनामूल्य वितरणदेखील प्रशासनाकडून करण्यात आले होते.


तुळशीला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारितील सर्व विभागीय रोपवाटिकांमध्ये तसेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील रोपवाटिकेमध्ये त्याची लागवड करण्यात येते. संपूर्ण वर्षभर नाममात्र १ रुपये दराने ही रोपे विक्रीसाठी उपलब्ध असतात. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, सर्वसामान्य नागरिक तुळशीची रोपे मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. कार्तिकी शुद्ध एकादशी ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चालणारा तुलसी विवाह कालावधी, यासह विविध सण-उत्सवात तुळशीच्या रोपांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. यंदादेखील दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु झालेल्या तुलसी विवाह विधी कालावधीत तुळशीच्या रोपांना वाढती मागणी आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

तुळशीचे हे आरोग्यदायी गुणधर्म

तुळस वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऑसिमम संक्टम (Ocimum sanctum) असे आहे. लमीएसी (lamiaceae) म्हणजे पुदिनाच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती म्हणून ती ओळखली जाते. आशिया, युरोप व आफ्रिका या खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशात तुळशीची झुडुपे आढळतात. तुळशीची रोपे सुमारे ३० ते १२० सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात. बहुगुणी फायद्यामुळे आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. कोविड – १९ वरील उपचार करताना उपयुक्त ठरु शकणाऱया वनस्पतींची यादी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने तयार केली होती. ‘२० औषधी वनस्पती २०२०’ या नावाने प्रकाशित सदर ई पुस्तकामध्ये देखील तुळशीचा समावेश करण्यात आला आहे. तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. रक्तशुद्धीकरण, प्राणवायू पुरवठा, दुर्धर आजारांमध्ये मदतकारी व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास तुळशीची मदत होते, असे मानले जाते. यामुळेच भारतीय संस्कृतीत तुळशीला पवित्र व पूजनीय मानले जाते.

===

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!