मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून एसटी कर्मचा-यांचा संप अजूनही संपलेला नाही मुंबईतील आझाद मैदानात शेकडो एसटी कर्मचारी ठाण मांडून आहेत. ऊन वारा आणि आता पावसाचा सामना करीत आस लावून बसले आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे केलीय.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्यापही सुरुच आहे. परिवहन मंत्री अनिल परब, एसटी कर्मचारी संघटना प्रतिनिधी आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आज आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचारी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट घेतली.
फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, विविध विषयांच्या धुराळ्यात एसटी कर्मचार्यांचे प्रश्न आहे तसेच कायम आहेत. ऊन, वारा आणि आज तर पावसाला तोंड देत 10 दिवसांपासून एसटी कर्मचारी आस लावून आहेत. दिशाभूल, संभ्रम, खोटे आरोप,फसवाफसवी, माध्यम व्यवस्थापन इत्यादी काही काळ बाजूला ठेऊन त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्याल का ? असा सवाल ट्विटद्वारे विचारला आहे. आझाद मैदानात एसटी कर्मचा-यांसोबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत ठाण मांडून बसले आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज पुन्हा एकदा या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.