ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे उभारण्यात आलेल्या संप-पंप हाऊस व जलकुभांचा लोकार्पण सोहळा महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते आज पार पडला. या जलकुभांमुळे घोडबंदर रोडवरील प्र.क्र. 1 मधील पाण्याचा प्रश्न सुटणार असून नागरिकांना मुबलक व नियमित पाणीपुरवठा होईल असे महापौरांनी यावेळी नमूद केले. तर नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी देखील सातत्याने प्रयत्न करीत आहोत. रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूकीवरील भार कमी व्हावा या दृष्टीने जलवाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करीत आहोत. कोलशेत ते डोंबिवली या जलवाहतूक प्रकल्पासंदर्भात मेरी टाईम बोर्डासोबत बैठक घेवून सदरचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टीकोनातून काम सुरू असल्याचे खासदार राजन विचारे यांनी यावेळी नमूद केले.

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठा अंतर्गत रिमॉडेलिंगचे काम सुरू आहे. महापालिकेच्या स्वतंत्र पाणीपुरवठ्यातून वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी विविध उपाययोजनांची कामे मंजूर करुन याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. घोडबंदर रोड परिसरात नव्याने दोन जलकुंभ व संप-पंप देखील उभारण्यात आला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पाणीपुरवठ्याव्यतिरिक्त प्रतिदिन 12 द.ल.लि प्रतिदिन इतका पाणीपुरवठा या जलकुंभामार्फत होणार आहे. तसेच 15 लक्ष क्षमतेच्या संपमधून 100 अश्वशक्तीच्या तीन पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. सुमारे 29 कि.मी लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्याचे काम पूर्ण् करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने महापालिका कार्यक्षेत्रातील इतर विभागातही पाणीपुरवठा मुबलक होईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्याची कार्यवाही सुरू आहे असेही महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.

८० हजार नागरिकांना फायदा होणार …

या दोन्ही जलकुंभामुळे घोडबंदर रोड परिसरातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार असून यामध्ये हावरे सिटी, रौनक हाईट, रोझा गार्डनिया, पारिजात गार्डन, महावीर कल्पवृक्ष, पाचवड पाडा, पुराणिक टोक्यो बे, वेदांत हॉस्प‍िटल, विहंग व्हॅली, उन्नती ग्रीन, प्लॅटिनम लॉन्स, कॉसमॉस ज्वेल्स, पार्क वुड, युनिक ग्रीन, साईनगर, भक्तीपार्क , ऋतु एन्क्लेव्ह, संघवी हिल्स, ग्रीन स्क्वेअर, ग्रॅण्ड स्क्वेअर सुदर्शन स्काय गार्डन आदी विभागातील 80 हजार नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती अध्यक्षा साधना जोशी, स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर, दिलीप ओवळेकर, रवी घरत, मुकेश ठोंबरे, नितीन लांडगे तर प्रशासनाच्या वतीने नगरअभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता विकास ढोले, हनुमंत पांडे, उपअभियंता अतुल कुलकर्णी, संजय शेट्ये, सोपान सुरवसे, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *