मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली यावेळी विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला. राज्यात कायद्याचे नव्हे तर काय दे चे राज्य आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले की, आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी. महाराष्ट्राची अशी अवस्था कधीच झाली नव्हती. एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती‘ उपक्रम चालू आहे अशी घाणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली. पण महाराष्ट्र मात्र काहीच करायला तयार नाही. हे म्हणतात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. मंदिर बंद होते, पण दारू सुरू होती ना ! त्यातून तुम्ही कमाई केलीच ना. महाराष्ट्रात मात्र रोज सकाळी नरेंद्र मोदींचे नाव घेऊन रडतात. बिल्डरांना सवलती देताना यांना GST आठवत नाही, गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या GSTचे रडगाणे गातात अशा शब्दात फडणवीस यांनी टीका केली.

संजय राऊतांवरही निशाणा
फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावत खोचक टीका केली. राऊत यांची अवस्था कोण होतास तू…काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. राज्यात अमरावती, मालेगावमध्ये निघालेले मोर्चे हे नियोजन करून निघाले. त्याला सरकारचे समर्थन होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *