मुंबई, दि. १५ : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी बिरसा मुंडा यांनी आपले जीवन अर्पण केले. त्यांचे कार्य प्रेरणादायी आणि अतुलनीय असून बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला जागृत करण्याचे कार्य करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे कार्य अविस्मरणीय आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी शासनही सकारात्मक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आदिवासी बांधवांनी ढोल नृत्य आणि तारपा नृत्य सादर केले,यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनीही आदिवासी बांधवांसोबत ठेका धरला.

बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पहिल्या जनजातीय गौरव दिनाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले होते. यावेळी आदिवासी बांधवांना संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन म्हणून शासनाने त्यांचा जयंती दिन ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी समाज कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. देश निर्माणासाठी आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग आहे. आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे तसेच रुढी, प्रथा, परंपरा आहेत त्यांची जपणूक केली पाहिजे. आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व्यवसाय, शेती यांना चालना दिली तर दुर्गम भागात राहणारा हा समाज प्रगती करेल. असेही कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते सामूहिक वन हक्क दावे लाभार्थी, वैयक्तिक वन हक्क दावे लाभार्थी, वनहक्क पट्टे मिळालेले लाभार्थी, प्रकल्प अधिकारी डहाणू अंतर्गत आश्रमशाळा येथील सर्वात लहान उपग्रह निर्मिती प्रकल्पातील सहभागी जागतिक विक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, महाराष्ट्र शासनातर्फे सुपर ५० विशेष कार्यक्रमाअंतर्गत जे.ई.ई. आणि नीटमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी, राज्यातील एकलव्य निवासी शाळा मधील विद्यार्थी, माऊंट एव्हरेस्ट सर केलेले गुणवत्ताधारक विद्यार्थी, नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत तयारीसाठी प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेले विद्यार्थी, आदिवासी समाजातील शासकीय योजनेचा लाभ घेतलेले यशस्वी उद्योजक, चित्रपट कलाकार, धातूपासून शिल्प तयार करणारे कलाकार, महिला बचत गटधारक यांचा सत्कार करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना टॅबचेही वाटप करण्यात आले. राज्यपालांनी आदिवासी बांधवांनी उभारलेल्या बचतगटाच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अनुपकुमार यादव यांनी केले. आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी आभार मानले.

**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!