मुंबई, दि. 15 : नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo – VC Mixer) हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रदर्शनात ५० स्टार्टअप्ससह साधारण ७० हून अधिक गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला. तरुणांनी शोधलेल्या विविध स्टार्टअप्सच्या नवनवीन संकल्पनांची गुंतवणूकदारांनी पाहणी केली व त्यामध्ये गुंतवणुकीत स्वारस्य दाखविले. तरुणांमधील संशोधन, नवसंकल्पना यांना चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी मिथुन जॉन, सिकोया कॅपिटल इंडियाच्या मुख्य सार्वजनिक धोरण अधिकारी श्वेता राजपाल-कोहली आदी मान्यवर उपस्थित होते. ­

कौशल्य विकास मंत्री मालिक यावेळी म्हणाले, स्टार्टअप्सला प्रोत्साहनासाठी विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्टार्टअप सप्ताहातून पुढे आलेल्या संशोधनाला चालना देण्यासाठी त्यांना १५ लाख रुपयांची शासकीय कामे देण्यात येत आहेत. नविन संकल्पनांना पेटंट मिळविण्यासाठी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या क्षेत्राला अजून पाठबळ देण्यासाठी बीकेसी येथे जागतिक दर्जाचे इनक्युबेशन सेंटर चालू करण्यात येईल. स्टार्टअप्सना ग्रामीण, तालुका, जिल्हा पातळीवरही प्रोत्साहन देण्यात येईल. महिला उद्योजकतेला चालनेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्टार्टअप्स व गुंतवणूकदारांना जोडून स्टार्टअप्सना त्यांच्या कल्पनांचे मोठ्या उद्योगात रूपांतर करण्यासाठी Startup Expo – VC Mixer हा उपक्रम फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व सिकोया कॅपिटल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सच्या क्षमता बांधणीसाठी “Surge – Founder Starter Pack” या मराठीतील पुस्तिकेचे प्रकाशन झाले. पुस्तिकेतील स्टार्टअप यशस्वीतेची मूलभूत तत्वे महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील उद्योजकांना उपयोगी ठरणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती www.surgeahead.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *