मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मान दुखीच्या उपचारासाठी आज (10 नोव्हेंबर) गिरगावातील एच एन रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून, दोन ते तीन दिवस उपचार घेणार आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रकृतीसंदर्भात निवेदन करताना म्हणटले आहे की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच.
पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे
यानिमित्ताने एकच सांगायचे आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो. असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.
एसटी कर्मचा-यांनो तुम्ही आमचेच आहात : मुख्यमंत्री
एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे
गेल्या १४ दिवसांपासून एसटी कर्मचायांनी संप पुकारला आहे त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होत आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रयानी हे आवाहन केले आहे उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी विनंतीही मुख्यमंत्रयांनी केली आहे.