मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या 236 अशी होणार आहे.

मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम 5 मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या 227 इतकी आहे. ही संख्या 2001 च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. 2011 च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहीली. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये 3.87 टक्के इतकी वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या 236 अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्य सरकारने प्रभागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून अध्यादेश काढण्यात आल्यानंतरच प्रभाग फेररचना करण्यात येणार आहे.

राज्यात शहरी भागात झपाट्याने लोकसंख्या वाढत असून, त्यामुळे नागरी विकास योजनांचा वेग वाढवण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून ऑक्टोबरमध्येच घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील महापालिका व नगरपरिषदांच्या नगरसेवकांच्या सदस्य संख्येत १७ टक्के वाढ करण्यात आली. मात्र तेव्हा मुंबई महानगरपालिकेबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *