मुंबई : कल्याण पूर्वेत पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या शेजारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. मात्र त्या जागेत पालिका कार्यालयाचे आरक्षण असल्याने स्मारक उभारण्यात तांत्रीक अडचण निर्माण झाली होती. अखेंर बुधवार नगरविकास विभागाने आरक्षण बदलण्याचा निर्णय जाहीर केल्याने स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी अनुयायांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे.

कल्याण पूर्व भागात आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी आहे. या भागात एक भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. अन्यायातून बाहेर येण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या या महामानवाला स्मारकाच्या रूपाने आदरांजली वाहावी या हेतूने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. स्मारकाच्या उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. स्मारकासाठी अपेक्षित असलेली जागा ही एकूण ८१०० चौरस मीटर आरक्षण क्रमांक ४२३ ही प्रभाग कार्यालयाच्या उभारणीसाठी आरक्षित होती. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करून आरक्षण बदलासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचवेळी समांतर पद्धतीने स्मारकासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या स्मारकाच्या कामासाठी नगरविकास विभागाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र स्मारकाच्या आरक्षण बदलाच्या प्रतीक्षेत स्मारकाचे काम रखडले होते.

अखेर आरक्षणात बदल केला…

अखेर बुधवार ३ नोव्हेंबर रोजी दीपावलीच्या पूर्वसंध्येला नगर विकास विभागाने मौजे तिसगाव येथील ड प्रभाग कार्यालयात शेजारील एकूण ८१०० चौरस मीटर जागेपैकी १३०० चौरस मीटर जागेचे आरक्षण बदलण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. नव्या आरक्षणानुसार १३०० चौरस मीटरचे आरक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी असणार आहे. या आरक्षण बदलामुळे गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा रखडलेला हा प्रश्न निकाली निघाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी अनुयायांसाठी ही अनोखी भेट डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. स्मारकाच्या कामात वेगाने प्रक्रिया करणाऱ्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकत शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *