ठाणे : राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे – गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या जळगाव दौ-यात एका ज्योतिषाच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिंदे हे नियमितपणे जिल्ह्याचा दौरा करीत आहेत. जिल्ह्यात विकास कामे करू नका, तुमच्या कामांमुळे आम्हाला मिळणाऱ्या पैशाचा ओघ थांबला आहे. विकास कामे करू नका, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ, अशी धमकी नक्षल्यांनी पत्रातून दिल्याची माहिती मिळत आहे. याआधी देखील एकनाथ शिंदे यांना विविध संघटित टोळ्यांकडून धमक्या आल्या होत्या.

एकनाथ शिंदेची ज्योतिषाची भेट ? ….
दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे हे जळगाव दौ-यावर आले होते. या दौ-याच्यावेळी पाचोरा येथे त्यांनी एका ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. या गुप्त भेटीने खळबळ उडाली आहे. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवतो असे जाहीर वक्तव्य केले होते, त्यामुळे तर शिंदे हे आपले नशीब आजमावण्यासाठी भविष्यकाराकडे गेले नव्हते ना ? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

शिवसेनेतील वजनदार मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार ? अशी चर्चा रंगली होती त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव अग्रस्थानी होते. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काही महिने काम केले होते. मात्र उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने शिवसेनेतील शिंदेसह अनेक नावे मागे पडली होती. नुकताच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्रयाच्या वक्तव्यानंतर शिवसेनेतील अनेकांना मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पडू लागले आहेत.

गडचिरोलीत पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी..
नक्षलवाद्यांच्या धमकीला न डगमगता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलिस जवानांच्या सोबत दिवाळीचा सण साजरा केला.
नक्षली कारवायांमुळे अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भगात सणवार सोडून आपले कर्तव्य बजावणाऱ्या लांब पोलिस जवानांना यावेळी दिवाळीच्या खास शुभेच्छा देऊन फराळाचे वाटप केले. यावेळी गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक अंकित गोयल हेदेखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *