ठाणे : एकिकडे बस कर्मचा-यांच्या संप आणि दुसरीकडे लोकलचे तिकिट मिळेना अशी अवस्था गुरूवारी प्रवाशांची झाली. कोरोनाची लाट ओसरल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे त्यामुळे राज्यात अनलॉक करण्यात आला. मात्र प्रवाशांना लोकलमध्ये पासशिवाय अजूनही नो एन्ट्री असतानाच आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांनाही नव्या नियमानुसार तिकिट नाकारण्यात आल्याने गुरूवारी कल्याण तिकिट काऊंटरवर प्रवाशांनी गोंधळ घातला. आता जनतेचा कोणीच वाली नाही ? असाच प्रश्न यानिमित्त प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे.
सकाळी बस स्थानकात बस कर्मचाऱ्याच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले, हे प्रकार सर्वत्रच पाहावयास मिळाले असतानाच लोकलचे तिकिट न मिळाल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांनी कल्याणच्या रेल्वे तिकीट काऊंटरवर गोंधळ घालीत संताप व्यक्त केला. मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधी तिकीट दिलं जात होतं, मात्र नवीन नियमानुसार आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील तिकिट मिळणार नाही. त्यांनाही इतर प्रवाशांप्रमाणे लोकलचा पास काढावा लागणार आहे. बस संपामुळे तिकीट घेण्यासाठी आलेल्या या कर्मचार्यांना रेल्वे तिकीट काउंटर वर तिकीट न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी रेल्वे तिकीट काउंटर वर वाद घातला. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्याना नवे नियम सांगितले जात होते, काउंटरवर याबाबत अनाऊन्समेंट केली जात होती .मात्र या निर्णयाबाबत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला .