ठाणे : मुंबईच्या शेजारी असलेल्या पालघर व ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्या ठाणे जिल्ह्याला धरणातील पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या काळू व शाई प्रकल्पाच्या कामास वेग द्यावा. तसेच पुढील सन 2050 पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून वाढती लोकसंख्या व पर्यायाने वाढत असलेली पाण्याची गरज तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागांना दिलासा देण्यासाठी कोणत्या प्रकारची पावले उचलावी लागतील याचा आराखडा तयार करावा. तसेच पिंजाळ, दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प, काळू प्रकल्प, कोंढाणे, सुसरी नदी प्रकल्प आदी प्रस्तावित प्रकल्पांची कामे सुरू करण्यासंदर्भात नियोजन करावे असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.


ठाणे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची आढावा बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोपर येथील सिंचन भवनात झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार दौलत दरोडा, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जलसंपदा विभागाचे सचिव (जलसंपदा) अ. प्र. कोहिरकर आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्रलंबित जलसंपदा प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स गठित करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. या टास्कफोर्सने उपाययोजना सुचविल्यानंतर मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्तीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. तसेच काळाची पावले ओळखून हे प्रकल्प टरशरी प्रकल्पांत रूपांतरित करून ते पाणी उद्योगासाठी वापरावे यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रयत्न करावे असे निर्देश यावेळी देण्यात आले. जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, मुमरी, नामपाडा, पवाळे, कुशिवली, काळू, शाई या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीतील कामांचा आढावा घेतला.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी जिल्हयातील प्रकल्पांना वेग देण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने प्रलंबित कामांचा आढावा घेऊन येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. तसेच शहापूर व परिसरातील गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी. भातसा, नामपाडा, पोवाले, काळू आणि शाई या धरणांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यासोबतच या धरणांच्या काम पुढे सरकावे यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून त्यांना निधी उपलब्ध करून देता येणे शक्य आहे अथवा नाही याबद्दल चर्चा करण्यात आली. शहापूरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी बाहुली धरणाच्या कामाला गती देणे व ते पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्यास भातसा नदीतून उपसा करून पाणी योजना राबवण्याची परवानगी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *