ठाणे दि. 26 :-शालेय बसमध्ये क्षमतेच्या केवळ ५० टक्के विद्यार्थ्यांना नेता येणार आहे. इंधनाचे वाढलेले भाव आणि त्या तुलनेत कमी प्रवासी वाहतुकीचे निर्बंध असल्याने शालेय बस संघटनांनी दरवाढीची मागणी केली आहे. तर, कमी क्षमेतेने विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यामुळे पालकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

जिल्ह्यात शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस ऑपरेटरसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मानक कार्यपध्दती (एसओपी) तयार केली असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे असे आवाहन ठाण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस ऑपरेटरसाठी एसओपी तयार केली स्कूल बस ऑपरेटर यांनी कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकिकरण केलेल्या स्थितीत ठेवावे. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या चालकाने प्रत्येक फेरीअंती आपल्या बसचे निर्जंतुकिकरण करावे. स्कूल बसचा चालक तसेच सहवर्तीने (अटेंडंट) मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. स्कूल बसचा चालक तसेच सहवर्तीचे (अटेंडंट) कोविड विरोधी लसीकरणाचे 2 डोस पूर्ण झालेले असावेत. विद्यार्थ्यांच्या वापरासाठी बसमध्ये काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. मास्क परिधान न केलेल्या विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश न नाकारता त्यांना अतिरिक्त ठेवण्यात आलेल्या मास्कमधून मास्क वापरासाठी उपलब्ध करुन द्यावा.

बसच्या प्रवेशव्दाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच सहवर्तीने (अटेंडंट) विद्यार्थ्यास प्रवेश देताना त्यांचे हात सॅनिटायझरने निर्जंतुक करून घ्यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे थर्मल गनद्वारे तापमान घेण्यात यावे. एखादया विद्यार्थ्यास ताप, सर्दी खोकला इ. प्रकारची कोव्हीड-19 आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास, अशा विद्यार्थ्यांना बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. तथापि, अशा विद्यार्थ्यास त्वरीत त्याच्या पालकांच्या ताब्यात द्यावे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बस वाहनांमधून एका आसनावर प्रत्येकी एक या प्रमाणे व वाहनाच्या आसन क्षमतेच्या जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस परवानगी असेल. स्कूल बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थी शारिरीक अंतराचे (सोशल डिस्टंसिंग) पालन करतील याची दक्षता सहवर्तीने (अटेंडंट)/ चालकाने घ्यावी. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. तसेच वातानुकूलीत बसेसमध्ये 24 ते 30 डिग्री सेल्सीअस इतके तापमान राखावे. शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये, त्यांना कचराकुंडीचा वापर करण्याच्या व स्कूल बस स्वच्छ राखण्याच्या सुचना द्याव्यात. स्कूल बसचे निर्जंतुकिकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची असेल.

या सुचनांचे पालन न केल्यास परवानाधारका विरुध्द मोटार वाहन अधिनियम, 1988 केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतुदीनुसार उचित कायदेशिर कारवाई स्थानिक प्रशासना मार्फत करण्यात येईल. स्कूल बस परवान्यावरील वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांमधून विद्यार्थ्यांची ने आण होणार नाही, याकडे स्थानिक पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आलय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *