कल्याण : महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठत विक्रीसाठी महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात २० स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोरोना सकंटामुळे डबघाईला आलेल्या बचत गटांना उत्पन्नाचा स्त्रोत प्राप्त होणार आहे.

कल्याण डोंबिवली मनपाच्या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे ७९७ महिला बचतगट, खुले ७५० महिला बचतगट असे एकंदरीत १५४७ महिला बचत गट नोंदणीकृत आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालांची विक्री करून महिलांना सक्षमीकरण केले जात आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संकट आणि लॉकडाऊनचा मोठा फटका महिला बचत गटांनाही बसला. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मनपाने २३ ते २७ आँक्टोबर या कालावधीत महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी मनपा मुख्यालय लगत सुमारे २० स्टाँल माफक दरात उपलब्ध होणार असल्याची माहिती समाज कल्याण अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी दिली. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अनंत कदम आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचारी महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *