ठाणे, दि २२ : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे संरक्षण मिळावे यासाठी आरोग्य विभागामार्फत सोमवार दि. २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत मिशन युवा स्वास्थ मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी आढावा बैठक घेतली. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातुन झालेल्या या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य सहभागी झाले होते.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अंबरनाथ येथे ९, कल्याण येथे ७, भिवंडी येथे १७, शहापूर येथे १४ तर मुरबाड येथे १० अशी एकूण सुमारे ५७ महाविद्यालये असून त्यातील प्राचार्य आजच्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी मिशन युवा स्वास्थ मिशन बाबत माहिती दिली आणि ही मोहीम यशस्वी करून युवा वर्गाला कोरोना लस देऊन संरक्षित करण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे आवाहन वैदेही रानडे यांनी केले. या मोहिमेत १०० टक्के विद्यार्थ्यांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी जर पहिला डोस याआधी घेतला असेल तर त्याविषयीची स्वतंत्र यादी महाविद्यालयांनी सादर करण्याचे वैदेही रानडे यांनी सांगितले.

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरु झाली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे कवच मिळावे यासाठी आरोग्य आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या समन्वयातून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त या मोहिमेचे नियंत्रण करणार आहेत. मिशन युवा स्वास्थ मोहिमेंतर्गत महाविद्यालयांमध्ये गरजेनुसार विशेष लसीकरण सत्र सुरू करून विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना या सत्रांमध्ये लसीचा पहिला अथवा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांकडून जिल्हा आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात येणार आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयात तीन खोल्यांमध्ये लसीकरणाची सुविधा केली जाणार आहे, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

लसीकरण मोहिमेत आतापर्यंत (२० ऑक्टोबर पर्यंत) संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ७० टक्के नागरिकांना (५२ लाख ५५ हजार ८९६ नागरिकांना) पहिला डोस तर ३४ टक्के नागरिकांना (२५ लाख ५० हजार २१६) दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील ७५ टक्के (३१ लाख ५१ हजार ३३४ जणांना) पहिला तर २६.८१ टक्के (११ लाख १९ हजार ५६७) जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *