महापौर नरेश म्हस्के आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्यात जुंपली
ठाणे : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र असले तरी सुध्दा ठाण्यात राष्ट्रवादी व शिवसेना आमने सामने आल्याचे पाहावयास मिळत आहे. लसीकरण मोहिमेवरून आज महापौर दालनात दोन पक्षांमध्ये राडा झाल्याचे पाहावयास मिळाले. महापौर नरेश म्हस्के विरूध्द राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्या शाब्दीक हमरी तुमरी जुंपली. त्यामुळे ठाण्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले.
कळवा-खारीगाव येथे आयोजित केलेल्या महालसीकरण शिबिरात राष्ट्रवादीवर महापौर नरेश म्हस्के यांनी ‘ लसीकरणासाठी लागणारा दहा लाखांच्या खर्चाचा भार आम्ही उचलला होता’ अशी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, गटनेते नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे पालिकेत जाऊन महापौरांना 20 लाख रुपयांचा धनादेश देण्याचा प्रयत्न केला. त्या पैशात नगर विकास मंत्री यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात लसीकरण शिबिर घेण्याची तयारी राष्ट्रवादीने महापौरांना सांगितली. मात्र त्यानंतर आनंद परांजपे आणि नरेश म्हस्के यांच्यात प्रचंड शाब्दिक चकमक उडाली.महापौरांनी धनादेश न स्वीकारता आपण गटनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्याशिवाय कोणाला ओळखत नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर महापौर आणि आनंद परांजपे यांच्यामध्ये प्रचंड भांडण झाल्याचे पाहावयास मिळाले.
तसेच दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने कळवा भागात आयोजित केलेलया लसीकरण मोहिमेचे बॅनर्स फाडण्यात आले हेाते. शिवसेनेच्या कार्यकत्यांनी हे बॅनर फाडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. त्याचा जाबही परांजपे यांनी महापौरांना विचारताच दोघांमध्ये जोरदार शाब्दीक भांडण जुंपले. त्यामुळे राज्यात सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना व राष्ट्रवादी ठाण्यात आमने सामने आल्याचे दिसून येत आहे.