ठाणे : कल्याण शीळ रोडवरील काटई-पलावा जंक्शन येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामाची सुरूवात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शनिवारी रात्री १२ वाजता श्रीफळ वाढवून करण्यात आली. विशेष म्हणजे याप्रसंगी मनसे आमदार राजू पाटील यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्या नजरा खिळल्या गेल्या.
शिळ – कल्याण रस्त्यावरील पलावा जंक्शन परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागत आहे, हा पूल झाल्यावर नागरिकांना यातून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
सातत्याने पाठपुरावा करुन पुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास (जीएडी) रेल्वेकडून मंजुरी मिळवून घेत पुलाच्या कामातील महत्त्वाचा टप्पा पार करत पुलाचे काम पुन्हा सुरु झाले.शिळ-कल्याण रस्त्याच्या सहापदारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून याचाच एक भाग असलेल्या या पुलाचे काम देखील वेगाने सुरु आहे असे खासदार डॉ शिंदे यांनी सांगितलं.
अवजड वाहनांना प्रवेश बंद
दि. १६/१०/२०२१ ते दि.२०/१०/२०२१ रात्री १०:०० वा. ते सकाळी ०६:०० वा. पर्यंत लोढा-पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पुल निर्माण सुरु असल्यामुळे अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील.
*प्रवेश बंद – कल्याण फाटा कडून कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड़ अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग –
१) कल्याण फाटा कडून कल्याण कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहने ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास मार्गे- खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
*प्रवेश बंद- कल्याण कडून कल्याण फाटा कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनाना बदलापूर चौक येथे “प्रवेश बंद”
पर्यायी मार्ग :
२) कल्याण कडून कल्याण फाटा कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहने ही बदलापूर चौक-खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.