३४३ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण
मुंबई : करोना महामारी सुरू झाल्यापासून मुंबईत पहिल्यांदाच करोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची दिलासादायक बातमी समोर आलीय. तर दुसरीकडे कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर कोविड लसीकरणाचा प्रभागव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे निष्कर्षावरून स्पष्ट झालय. त्यामुळे मुंबईकरांसाठी दोन्ही बातम्या आनंददायक ठरल्या आहेत.
कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेने आजवर दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱया तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. तिसऱया तुकडीमध्ये एकूण ३४३ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणे आवश्यक असून कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आलय.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये तिसऱया चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३४३ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. नमुने घेतलेल्या बाधित ३४३ रुग्णांपैकी ४५ रुग्ण (१३ टक्के) हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात १२६ रुग्ण (३७ टक्के), ४१ ते ६० वर्षे वयोगटात ९८ रूग्ण (२९ टक्के), ६१ ते ८० वयोगटात ६३ रुग्ण (१८ टक्के) आणि ८१ ते १०० वयोगटातील ११ रुग्ण (३ टक्के) या चाचणीमध्ये समाविष्ट आहेत.
चाचणीतून निष्कर्ष …
चाचणीतील निष्कर्षानुसार, ३४३ पैकी १८५ रुग्ण (५४ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर ११७ रुग्ण (३४ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये इतर प्रकारांचे ४० बाधित रुग्ण (१२ टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे. डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण / प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. असे असले तरी, कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
पहिला डोस घेतलेले …
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोविड लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, पहिला डोस घेतलेल्या ५४ नागरिकांना कोविड बाधा झाली तरी फक्त ७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. ५४ पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
दोन्ही डोस घेतलेले ….
दोन्ही डोस घेतलेल्या १६८ नागरिकांना कोविड बाधा झाली असली तरी त्यापैकी फक्त ४६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही अवघ्या ७ जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. मात्र कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद करण्याजोगी आहे.
एकही डोस न घेतलेले …
याउलट, लसीचा एकही डोस न घेतलेल्या १२१ नागरिकांना बाधा झाली. त्यातील ५७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाब ग्रस्त होते. यातील दोघांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ तर एकास ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झालेली होती. मात्र, या तिन्ही रुग्णांनी कोविड बाधा निष्पन्न होवूनही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्याने त्यांच्या जीवावर बेतले.
लहान मुलांना कोविडची बाधा नियंत्रणात
वय वर्ष १८ पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण ३४३ रुग्णांपैकी २९ जण (८ टक्के) या वयोगटात मोडतात. पैकी ११ जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’, १५ जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ आणि ३ जणांना इतर प्रकाराची कोविड लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे.