मुंबई : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ संवर्गांतील विविध पदांसाठीच्या भरती परीक्षा सुधारित वेळापत्रकाप्रमाणे अनुक्रमे 24 आणि 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहेत. या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या पात्र परीक्षार्थींना परीक्षा प्रवेशपत्र (हॉलतिकीट) वितरीत करण्यास शुक्रवार, 15 ऑक्टोबरपासून सुरुवातही झाली आहे. या प्रवेशपत्रांत चुका झाल्याचा आरोप काही व्यक्ती आणि संघटनांकडून जाणीवपूर्वक केला जात असून त्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण या परीक्षांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आलेल्या ‘न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि.’ या कंपनीने केले आहे.
आरोग्य विभागाच्या ‘गट क’ आणि ‘गट ड’ या संवर्गातील साडेनऊ हजारांहून अधिक पदांची भरती या परीक्षांद्वारे होणार असून ती देणाऱ्या परीक्षार्थींची संख्या आठ लाखांहून अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात होणारी ही परीक्षा काही अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे परीक्षार्थींचे व्यापक हित डोळ्यांसमोर ठेवून पुढे ढकलण्यात आली होती. नुकतेच या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आणि तांत्रिक व अन्य त्रुटी दूर करून ही परीक्षा आता 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
करोनाविषयक नियमांचे पालन करून परीक्षा
यातील ‘गट क’ संवर्गासाठीची परीक्षा 24 ऑक्टोबर रोजी दोन सत्रांमध्ये पार पडेल, तर ‘गट ड’ संवर्गासाठीची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी एकाच सत्रात घेतली जाईल. राज्यभरातील एक हजाराहून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा राज्य शासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे आणि करोनाविषयक नियमांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने पार पडेल. परीक्षार्थींना प्रवेश पत्र वितरीत करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून त्याद्वारे त्यांना नेमून देण्यात आलेले परीक्षा केंद्र आणि अन्य आवश्यक माहिती देण्यात येत आहे.
प्रवेशपत्रांबाबत अफवा
आरोग्य विभागासारख्या महत्त्वाच्या आणि करोनाकाळात अतिभार असलेल्या शासनविभागात या परीक्षांच्या माध्यमातून होणारी पदभरती ही आश्वासक बाब आहे. परंतु राज्यातील काही व्यक्ती आणि संघटना जाणीवपूर्वक या परीक्षा प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी खोटे आणि निराधार आरोप करून परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. एकाच परीक्षार्थीला दोन सत्रांसाठी दोन स्वतंत्र परीक्षा केंद्रे दिल्याचा आरोप करत प्रवेशपत्रांबाबत चुकीची माहिती देऊन परीक्षा प्रक्रियेविषयी गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे सांगत या परीक्षांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘न्यासा कम्युनिकेशन’ने हे आरोप फेटाळले असून परीक्षार्थींनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
नियमावलीनुसारच परीक्षा केंद्रांची निश्चिती
या परीक्षांबद्दलच्या शासकीय परिपत्रकात नमूद नियमावलीनुसारच परीक्षार्थींना त्यांनी त्यांच्या अर्जात भरलेल्या माहितीनुसारच परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, असेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने स्पष्ट केले आहे. नागपूर किंवा पुणे विभागातील पदभरती परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना त्या विभागातीलच एखाद्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्र दिले गेले असून विविध पदांसाठी स्वतंत्र अर्ज केलेल्या परीक्षार्थींना स्वतंत्र परीक्षा केंद्रे दिली गेली आहेत, असेही ‘न्यासा कम्युनिकेशन’ने स्पष्ट केले आहे.
……………………….
जाणून घ्या परीक्षेविषयी…
- आरोग्य विभागाच्या साडेनऊ हजारांहून अधिक पदांसाठी होणार परीक्षा
- आठ लाखांहून अधिक परीक्षार्थी सहभागी
- 24 ऑक्टोबर रोजी ‘गट क’ संवर्गातील विविध पदांसाठी दोन सत्रांत परीक्षा
- 31 ऑक्टोबर रोजी ‘गट ड’ संवर्गातील विविध पदांसाठी एका सत्रात परीक्षा
- शुक्रवार, 15 ऑक्टोबरपासून प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने वितरणास सुरुवात
- परीक्षा केंद्रांची निश्चिती परीक्षा परिपत्रकातील नियमावलीनुसारच
- करोनाविषयक नियम पाळून चोख व्यवस्थापनासह पारदर्शक पद्धतीने होणार परीक्षा
- परीक्षार्थींनी वशिलेबाजीच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, गुणवत्तेच्या आधारावरच होणार निवड
…………………………….