मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशात हिंदुत्वाला धोका नसल्याचे सांगत असले तरी सुध्दा उपटसुंभ नवहिंदुत्वापासून सर्वाधिक धोका आहे आज जर हिंदुत्वाला धोका असेल, तर तो परकीयांपासून नाही. तो स्वकीयांपासूनच आहे. हिंदुत्वाच्या शिडीवर चढून इंग्रजांची फोडा आणि झोडा ही निती वापरली जात आहे. यांच्यापासून सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. १९९२-९३ साली शिवसेना उतरली नसती तर सध्या सत्तेसाठी टपून बसलेले कुठं राहिले असतं कळलंही नसतं. त्यावेळी केवळ बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या शत्रूंसमोर उभे राहिले होते. अशा शब्दात मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजप व आरएसएसवर टीका केली.
विजयादशमी निमित्त दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने यंदा ऑनलाइनऐवजी थेट घेण्यात आला. शिवाजी पार्कऐवजी यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला.
सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होता. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र अग्रेसर होता. बंगालनं दाखवून दिलं आहे, तीच जिद्द आपल्याला ठेवावी लागेल. हर हर महादेव म्हणजे काय हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तखत्याला दाखवून द्यावं लागेल.असंही ते म्हणाले.
आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. पण जर कोणी अंगावर आलं तर त्यांना सोडत नाही. आव्हान द्यायच तर निधड्या छातीने द्या… ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सच्या माध्यामातून देऊ नका. मी पण आव्हान पक्षप्रमुख म्हणून देतोय. मुख्यमंत्री म्हणून नाही. मुख्यमंत्री म्हणून आव्हान द्यायचं आणि पोलीसांच्या मागे लपायचं… ही वृत्ती नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपलार ठणकावलं.
ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली. मी पुन्हा येईन म्हणणारे आता मी गेलोच नाही…. मी गेलोच नाही.. असे म्हणत आहेत. मी मुख्यमंत्री आहे असे मला कधीही वाटू नये, मला तुमचा भाऊ समजा असंही ठाकरे म्हणाले. शिवसेनेला दिलेला शब्द पाळला असता तर तुम्ही परत मुख्यमंत्री झाले असता. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असतं, तर कदाचित मी या जीवनातून बाजुलाही झालो असतो. मी केवळ शिवसेना प्रमुखांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पद स्वीकारलं. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन अजून पूर्ण झालेलं नाही. कारण शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं वचन दिलं होतं आणि ते मी पूर्ण करणारच, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नरेंद्र मोदींवर टीका
“मै फकीर हू, झोली उठाके… असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीका केली. केंद्राचे अधिकार किती, राज्याचे अधिकार किती यावर चर्चा व्हायला हवी. केंद्राएवढेच सगळे राज्य सार्वभौम आहेत, असं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केल्यानंतर ठामपणे सांगितलं होतं.
“मोहनजींनी हिंदुत्व म्हणजे काय हे सांगितलं. पण आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला देश म्हणजे आमचा धर्म अशी शिकवण दिली आहे,” असं त्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना उद्देशून म्हटलंय. मोहन भागवत यांनी या देशात सर्वांचे पूर्वज एक होते, असं म्हटलं. ते खरं आहे. मग विरोधी पक्षांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का? लखीमपूर खिरीमध्य शेतकरी मारले गेले त्या शेतकऱ्यांचे पूर्वच परग्रहावरून आले होते का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.मोहन भागवत सत्ता मिळवण्याच्या लालसेनं आम्ही काही करत नसल्याचं म्हणाले. मात्र मग सत्ता मिळवण्यासाठी आज जे काही केलं जात आहे, ते तुमच्या शिकवणीतून बाहेर पडणाऱ्यांना का सांगत नाही, असंही ठाकरे म्हणाले.
‘उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय काय?’
राज्यपालांनी महिलांच्या एका अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यपालांनी विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन घेण्यासंदर्भात पत्र लिहिलं. त्यावर मी त्यांना नम्रपणे विनंती केली. महिलांवर देशभरात अत्याचार होत आहे, त्यामुळं पंतप्रधान मोदींना सांगून संसदेचं अधिवेशन घ्यायला सांगा, असं मी त्यांना म्हटलो. महाराष्ट्रात काही घडलं, की लगेचच लोकशाहीचा खून झाला असा गळा काढतात. पण मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुलला आहे की काय? असाही सवाल ठाकरे यांनी केला
सत्तेचं व्यसन हा देखील एक अंमली प्रकारच आहे. सर्व काही माझ्या अंमलाखाली असावं हेदेखील अंमली पदार्थाचे व्यसन आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. “हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढले आहेत, ते आता इंग्रजांची नीती साधू शकतात. तोडा फोडा आणि राज्य करा असं करून समाजात भेदभावाच्या भिंती उभ्या करून ते सत्तेची गाजरं खात बसतील.