सिधुदूर्ग : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वैर महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. मात्र चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ठाकरे-राणे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. पण ठाकरे राणे व्यासपीठावर एकत्र आले शेजारी बसूनही एकमेकांशी अबोला धरला. मात्र आपल्या भाषणात राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला तर मुख्यमंत्रयांनीही ठाकरे शैलीत त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे सिंधुदूर्गात ठाकरे- राणे सामना रंगल्याचे दिसून आले.
नारायण राणेंचा प्रहार ….
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर तोफ डागली. “विमानतळाला विरोध करणारे इथे स्टेजवरच आहेत, भांडं काय फोडायचं आणि किती फोडायचं?” असा सवाल करत राणेंनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं. राऊत यांनी सुभाष देसाई यांचा उल्लेख चिपी विमानतळाचे मालक असा केला. त्यावर बोलताना राणेंनी “मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण. वीरेंद्र म्हसकर गेले आणि दुसरे कधी आले कळलंच नाही हो. विमानतळ काय देसाई कंपनीचं आहे काय ? कसला प्रोटोकॉल? मला कळत नाही म्हसकर साहेब आपण राजीनामा दिला की कंपनी विकली. नियमानं करा. मान-सन्मान जनता देईल”, अशा शब्दांत राणेंनी तीव्र नाराजी दर्शवली. बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. खोटं बोलणाऱ्यांना साहेबांकडे थारा नव्हता. तुम्हाला मिळणारी माहिती खरी नाही’ तुमचे लोकप्रतिनिधी काय काम करतायत, याची माहिती गुप्तपणे कुणालातरी नेमून घ्या”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.
ठाकरी शैलीत प्रतिउत्तर …
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राणेंच्या टीकेला ठाकरी शैलीत प्रत्युत्तर दिलं. “आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. “मी ज्योतिरादित्यजी यांचे अभिनंदन करतो. तुम्ही इतके लांब राहून देखील मातीचा संस्कार विसरला नाहीत,” असं म्हणत केंद्रीय नागरी उड्डान मंत्री असणाऱ्या शिंदेंनी मराठीत भाषण दिल्याबद्दल कौतुक केलं. याचवेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी एकाच मातीत बाभळी आणि आंबेही येतात. बाभळी काय आल्या की पोसाव्या लागतात. माती चांगली असली तरी बाभळीला काटेच येणार, असं म्हणत उद्धव यांनी राणेंना टोला लगावला. पाठांतर करून बोलणे वेगळे, मळमळीने बोलणं वेगळं असतं, असे म्हणत राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली. बाळासाहेबांना खोटं बोलणं अजिबात आवडायचं नाही. त्यांना खोटं बोललेलं एक क्षणही आवडायचं नाही. अशी खोटं बोलणारी जी लोकं होती त्यांना बाळासाहेबांनी शिवेसेनेतून काढून टाकलं होतं, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोल. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. मला त्या इतिहासात जायचं नाही असे टोल लगावीत ठाकरे यांनी राणेंचा समाचार घेतला.
आठवलेंची कविता ..हास्याचे फवारे
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कवितेतून भाषणाला सुरूवात केली. राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर आठवलेंची कवितेच्या शैलीत भाष्य केले. आठवलेंच्या कवितेतून हास्यांचे फवारे उडाले.
‘एकत्र आले आहेत ठाकरे आणि राणे, मला आठवले महायुतीचे गाणे’
सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान,
कारण चिपीमध्ये आले आहे मुंबईवरून विमान’
‘सिंधुदुर्गात आली आहे विकासाची आंधी
म्हणून मला इथे येण्याची मिळाली संधी’