ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास पावसाळ्यात रस्ता वाहतूक योग्य न राखल्यामुळे तसेच गुणवत्तापूर्ण काम न केल्याप्रकरणी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच सिटीझन जर्नलिस्टने अधिका-यांना निलंबीत केले मात्र ठेकेदारांवर कारवाई कधी ? असा सवाल बातमीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. अखेर ठाणे महापालकेने ठेकदारावर कारवाईची बडगा उगारला आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी केली असता कामे दर्जा राखून योग्य न झाल्याबाबत व नागरिकांची गैरसोय झाल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने निविदाकारांना तातडीने कामे करणेबाबत व त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. परंतु दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण न केल्याने संबंधित ठेकेदारास तब्बल १० लाख रुपयांचा दंड महापालिका प्रशासनाने ठोठावला आहे.
एकनाथ शिंदेच्या आदेशाचे काय ? अभियंते निलंबीत ; ठेकेदाराला केवळ नोटीस !
ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ठराविक वेळेत, काम पुर्ण केले नसल्याने निविदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करणेबाबत ३ दिवसात खुलासा करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले होते. तसेच सदर कामासोबतच ३ दिवसाच्या कालावधीत कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील देखील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य गुणवत्ता राखुन काम पुर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु पावसाळ्यात रस्ता वाहतूक योग्य न राखल्यामुळे तसेच दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम न केल्यामुळे मे.बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास १० लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
…………………………